सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मारकुट्या पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत नाही तर दुर्धर आजाराने झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. वंचित बहुजम आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे, असे ट्विट अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. विरोधकांसह प्रकाश आंबेडकर यांनीही हे प्रकरण लावून धरले होते. तसेच काळा कोट चढवून त्यांनी कोर्टात युक्तिवादही केला होता.
महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
– – – – – – –
माननीय सर्वोच्च न्यायालय ने हमारे पक्ष में फैसला सुनाया है और महाराष्ट्र राज्य एवं अन्य बनाम…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 30, 2025
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही सरकारने हात झटकण्याचा प्रयत्न केला. आम्ही न्यायालयाला ही बाब लक्षात आणून दिली. सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली आणि उच्च न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही म्हणून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई होते का, हे पहावे लागेल, असेही ते म्हणाले.
एक आठवड्याच्या आत एफआयआर दाखल करा असे आदेश उच्च न्यायालायने दिले होते. पण आजपर्यंत एफआयआर दाखल झालेला नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याची परिस्थिती असून उच्च न्यायालय पोलिसांच्या विरोधात कारवाई करणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही अजूनपर्यंत एफआयआर दाखल का झाला नाही, असा सवाल केल्याचेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List