भाजपशासित मध्य प्रदेशात गुन्हेगारी वाढली! 23 हजार महिला, मुली बेपत्ता; अनेक आरोपी फरार, विधानसभेत सरकारची कबूली
महिला आणि अल्पवयीने मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर आता मध्यप्रदेशच्या सरकारने कबूली दिली आहे. मध्य प्रदेशात सध्या 23 हजारहून अधिक महिला आणि अल्पवयीन मुले बेपत्ता आहेत, असे सरकारने राज्य विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. तसेच बलात्कार आणि महिलांवरील इतर गुन्ह्यांशी संबंधित असलेले दीड हजार आरोपी फरार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2025 या दीड वर्षांच्या कालावधीत राज्यात बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींच्या संख्येबाबतची तसेच बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाला बच्चन यांनी विधानसभेत मागितली. तसेच याबाबत अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित केले. यावेळी सरकारने दिलेल्या काही प्रश्नाच्या उत्तरात ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात किती महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत, तसेच किती आरोपी अजूनही फरार आहेत.या निष्काळजी अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का, या सगळ्यांची उत्तरे सरकारने द्यावी अशी मागणी आमदार बाला बच्चन केली. यावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विधानसभेत धक्कादायक माहिती उघड केली. 30 जून 2025 पर्यंत, एकूण 21175 महिला आणि 1954 मुली एका वर्षापेक्षा जास्त काळ बेपत्ता आहेत. म्हणजेच राज्यातील बेपत्ता महिलांची संख्या 23129 वर पोहोचली आहे.
मध्य प्रदेशच्या सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, महिलांवर बलात्कार करणारे 292पुरूष आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारे 283 आरोपी अजूनही फरार आहेत. म्हणजे राज्यभरात 575 बलात्काराचे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. तसेच महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याशी संबंधित इतर प्रकरणांमध्ये 320 आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. म्हणजेच मध्य प्रदेशात महिला आणि मुलींवरील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले 1500 हून अधिक आरोपी सध्या बेपत्ता आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List