दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये रिसॉर्टमध्ये हायप्रोफाईल दारूपार्टी, छाप्यात मद्यधुंद 39 जणांना अटक
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विविध ठिकाणी चक्क दारूपार्ट्या झडत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील साणंद येथील ग्लेड गोल्फ रिसॉर्टमध्ये अशाच प्रकारच्या जंगी हायप्रोफाईल दारूपार्टीचे आयोजन करण्यात आले होते. येथे पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा घातलेल्या छाप्यात मद्यधुंद अवस्थेतील 13 तरुण आणि 26 तरुणींना अटक करण्यात आली. सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते.
पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सर्वांना साणंद येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. येथे साणंद पोलिसांनी संबंधित तरुण आणि तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला. ही हायप्रोफाईल दारूपार्टी शहरातील नामांकित विकासक प्रतीक सांघीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांना रात्री उशिरा रेड रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या दारूपार्टीची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मारलेल्या छाप्याप्रसंगी त्या ठिकाणी 100 जण उपस्थित होते.
राज्यात 65 वर्षांपासून दारूबंदी
गुजरातमध्ये 1 मे 1960 रोजी दारूबंदी लागू करण्यात आली. दारूची निर्मिती, विक्री आणि सेवन करण्याला बंदी आहे. मात्र, दारूबंदी लागू असतानाही राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. दरम्यान, सरकारने महसूल वाढवण्यासाठी गिफ्ट सिटीजमध्ये काही अटीशर्तींवर दारूचे सेवन करण्याची परवानगी दिली आहे.
कुटुंबीयांना बोलावले, सीलबंद बाटल्याही जप्त
रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलम गोस्वामी यांनी दिली. छापेमारीत साणंद, असलाली, चांगोदर, बोपल पोलीस ठाण्यांची पथके सहभागी झाली होती. तरुण-तरुणींच्या कुटुबीयांना तत्काळ बोलावून घेण्यात आले. अनेक सीलबंद दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. दरम्यान, प्रतीक सांघी याचा रियल इस्टेटचा आणि प्रह्जन फूड पंपनीचा व्यवसाय आहे. त्यानेच या पार्टीचे आयोजन केले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List