हेरिटेज पालिका मुख्यालयाची पर्यटकांना भुरळ, चार वर्षांत 20 हजार पर्यटकांची भेट; आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला यश
मुंबईचा कारभार हाकणाऱ्या व दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या मुंबई महापालिकेच्या हेरिटेज वास्तूची पर्यटकांना भुरळ पडली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाला प्रचंड प्रतिसादा मिळत आहे. गेल्या चार वर्षांत 20 हजारांवर पर्यटकांनी भेट दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेली पर्ह्ट येथील भव्य इमारत मुंबईसह महाराष्ट्र-हिंदुस्थानच्या जडघडणीची साक्षीदार राहिली आहे. गॉथिक शैलीत असलेल्या या देखण्या इमारतीची भुरळ मुंबईकरांनाच नव्हे, तर देशी-विदेशी पर्यटकांना पडते. या इमारतीचे सौंदर्य सर्वांना पाहता यावे यासाठी आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री असताना मुख्यालय इमारतीत ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्याची संकल्पना मांडली. जानेवारी 2021 मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दर शनिवारी, रविवारी या वॉकचे आयोजन केले जाते. या सहलीत महापालिकेच्या समृद्ध इतिहासाचा आणि या भव्य इमारतीच्या वास्तुशिल्पाची माहिती दिली जाते. ही सहल करू इच्छिणाऱयांना bookmyshow.com या संकेतस्थळावरून 350 रुपये शुल्क भरून नोंदणी करता येते, अशी माहिती सहल संयोजक भरत गोठोसकर यांनी दिली आहे.
फक्त 11 लाख 19 हजारांत बांधकाम
– मुख्यालय इमारतीचे संकल्पचित्र तत्कालीन प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी तयार केले होते. 31 जुलै 1893 रोजी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.
– रावबहादूर सीताराम खंडेराव हे बांधकाम खात्याचे निवासी अभियंता होते, तर पंत्राट व्यंकू बाळाजी यांनी घेतले होते. या इमारतीसाठी फक्त 11,88,082 रुपये एवढय़ा खर्चास मान्यता देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त 11,19,969 इतक्या खर्चात इमारत उभी राहिली.
असा आहे इतिहास…
4 सप्टेंबर 1873 रोजी महापालिकेची पहिली सभा झाली असली तरी या मुख्यालयाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य इमारतीमध्ये 16 जानेवारी 1893 रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ झाला. तेव्हापासून ही इमारत आणि महापालिका सक्षमपणे मुंबईचे पालकत्व सांभाळते आहे.
‘इंडो सार्सानिक’ स्थापत्य शैलीतील ही भव्य इमारत महानगराचा गाडा हाकते. महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामास 25 एप्रिल 1889 रोजी प्रारंभ झाला. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List