उरणच्या ओसाड जमिनीत पिकणार ‘हिरवे सोने’, आदिवासी बांधवांनी केली पट्टा पद्धतीने भाताची लागवड
चाणजे-उरणमधील ओसाड जमिनीत लवकरच ‘हिरवे सोने’ पिकणार आहे. वर्षानुवर्षे ओसाड असलेल्या या जमिनीवर आदिवासी बांधवांनी पट्टा पद्धतीने भाताची लागवड केली असून त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी काही टिप्सदेखील दिल्या आहेत. रासायनिक खते न वापरता नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून भातशेती करण्यावर भर देण्यात आला असून उरणमधील ओसाड जमिनी आता हिरव्यागार होणार आहेत.
उरण परिसरातील जास्तीत जास्त ओसाड जमिनी पिकवण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. उरण परिसरातील ओसाड पडलेल्या जमिनींवर भातपीक घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी परिसरातील आदिवासींची मदत घेतली जात आहे. या आदिवासींकडून परिसरातील शेकडो एकर जमिनी भातपिकाच्या लागवडीखाली आणण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर यांनी दिली.
शेतात रासायनिक खतांचा वापर न करता नत्र निर्मितीसाठी गिरीपुष्प झाडाचा पाला तसेच हिरवळीची खते वापरण्यात येणार आहेत. पट्टा पद्धतीची लागवड व चारसूत्रीच्या लागवडीमुळे उत्पन्नातदेखील वाढ होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
युरिया ब्रिकेट खतांच्या वापराविषयी आदिवासींना माहिती देण्यात आली. यावेळी आदिवासींनी पट्टा पद्धतीच्या भात लागवडीच्या प्रात्यक्षिकात भाग घेतला होता. त्यांना कृषी अधिकारी एस.डी गटकळ, उपकृषी अधिकारी ए. डी. बरकूल, आदिका पानसरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रयोग यशस्वी झाल्यास विस्तार करणार
उरण तालुक्यातील चाणजे या भागात ओसाड असलेल्या जमिनीवर भाताची लागवड यावर्षी प्रथमच करण्यात आली आहे. पाणी, खतांचे नियोजन तसेच अन्य आवश्यक असलेल्या बाबींचे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी आदिवासींना केले. ओसाड जमिनी हिरव्यागार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा तालुक्यात विस्तार करणार असल्याचे सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List