संशयकल्लोळ! ते चार मंत्री कोण? सरकार अडकले हनी ट्रपमध्ये!!
महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रपमुळे खळबळ उडालेली आहे. या ट्रपमध्ये राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असून हे मंत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक, ठाणे, मुंबई आणि मंत्रालयापर्यंत पसरले असून भाजप आणि मिंधे गटाच्या काही मंत्र्यांबाबत यामुळे संशयकल्लोळ उडाला आहे. हनी ट्रपचे उत्तर महाराष्ट्र कनेक्शन आणि या प्रकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे महायुती सरकारच आता अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे.
लोढाला अटक
भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबई पोलीसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखला करून अंधेरीतून त्याला अटक केली. पोलिसांकडून जळगावचे जामनेर आणि पहूर या ठिकाणी त्याच्या मालमत्तेची झडती घेतली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोलिसांनी जप्त केले.
चर्चा उत्तर महाराष्ट्राची
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये घडलेल्या हनी ट्रप प्रकरणात आजी माजी मंत्री तसेच 72 वरिष्ठ सरकारी अधिकाऱयांचा समावेश आहे. जळगावचे जामनेर या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असल्याचे बोलले जाते.
भाजप कनेक्शन
जळगाव जिह्यातील भाजपच्या मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल लोढा ओळखला जातो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसांत त्यांनी माघार घेतली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
ट्रपचा ट्रक…
- हनी ट्रपच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे.
- पोलिसांनी दिवसभरात चार ते पाच ठिकाणी छापे टाकले.
- हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले.
- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रपची सुरुवात झाली. शिवसेनेचे 16-17 आमदार, 4 खासदार याच प्रकरणातून गळाला लावले. या सगळ्याची सूत्रं जामनेर, जळगाव नाशिक, मुंबई आणि दिल्लीमधून हलली आहेत. ज्यांनी हे केलं ते स्वतः हनी ट्रपमध्ये सापडले आहेत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एक बटण दाबले तर देशात हाहाकार उडेल – खडसे
स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करू शकणार नाहीत, म्हणून एसआयटी स्थापन करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली.
महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता असलेला प्रफुल्ल लोढा याच्याकडे हनी ट्रपचे सगळे व्हिडीओ आहेत, एक बटन दाबले तर देशात हाहाकार उडेल, असा खळबळजनक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी आज दिला.
प्रफुल्ल लोढा हा जळगावच्या जामनेरचा निवासी असून भाजपमध्ये गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जातो. लोढाला हनी ट्रपमध्ये अटक झाली होती. याच लोढाने गिरीश महाजन आणि सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेल्या एका अधिकाऱयाविरुद्ध गेल्या वर्षी तक्रार केली होती. महाजनांच्या व्हिडीओवरून त्या अधिकाऱयाने जिवे मारण्याची धमकी दिल्याची लोढाची तक्रार होती, असा दावा खडसे यांनी केला आहे. त्यासंदर्भात लोढा याने स्वतः एक व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ खडसे यांनी आज प्रसारमाध्यमांना दाखवला. ट्रायडंट हॉटेलमध्ये काय घडले होते हे माहिती असल्याचे लोढाने त्या व्हिडीओत सांगितल्याचे खडसे म्हणाले.
ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मांडीवर जाऊन प्रफुल्ल लोढा नंतर कसा बसला? नेमके काय घडले… त्याच्याजवळ असे काय होते ज्याने देशभरात तहलका होणार होता, अशा प्रश्नांची सरबत्तीही एकनाथ खडसे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List