ठसा – फ्रेंच ओपनमध्ये गमावले, ते विम्बल्डनमध्ये कमावले!
>> अनिल दत्तात्रेय साखरे
भारतामध्ये जून-जुलैला आकाशात मेघ मल्हारच्या धारा सुरू झाल्या की, जगभरातील समस्त टेनिसप्रेमींना वेध लागतात ते ब्रिटिश उन्हाळ्यातील विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे. जवळपास 148 वर्षांची भव्यदिव्य अशी टेनिसची उज्ज्वल परंपरा. आज जगभरामध्ये मुख्यतः अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा चार मानाच्या टेनिस स्पर्धा खेळवल्या जातात. त्यात विम्बल्डनचा थाट म्हणजे राजेशाही थाट. अगदी हट्टाने हिरवळीवर खेळवली जाणारी ही एकच स्पर्धा. जगभरातील खेळाडूंना आकर्षित करीत असते.
या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अंतिम सामना यानिक सिनेर आणि अल्काराज अशा दोघांमध्ये रंगला. अगदी अटीतटीचा असा हा सामना झाला. शेवटच्या सेटपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते, पण शेवटी अल्काराजने आपल्या दमदार खेळीच्या हिमतीवरती पहिले दोन सेट गमावल्यानंतर दमदार खेळ करत बाजी मारली आणि विजेता ठरला. तो पराभव सिनेरच्या जिव्हारी लागला, पण एकंदरीत प्रेक्षकांना या सामन्यामध्ये उत्कृष्ट असा टेनिसचा खेळ बघायला मिळाला. तत्पूर्वी शनिवारी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यामध्ये पोलंडच्या इगा स्वियाटेकने अमेरिकेच्या अमांडाला 6-0, 6-0 अशा सलग दोन सेटमध्ये पराभूत केले. आमंडला कुठलीही प्रतिकाराची संधी न देता इगा स्वियाटेकने आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये दबदबा राखलेल्या इगा स्वियाटेकला विम्बल्डन स्पर्धा मात्र सातत्याने हुलकावणी देत होती, पण या वर्षी मात्र तिने आपली प्रतिस्पर्धी अमांडावर विजय मिळवताना ताकदवान परतीचे फटके, क्रॉस कोर्टवर मारलेले खोलवर फटके, त्यासोबत उत्तम सर्व्हिस आणि बॅक हँडच्या जोरावरती दोन सेटमध्ये एकही गेम न गमवताना या वर्षीचे आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आणि विम्बल्डनच्या रोझ वॉटर डिशवर आपले नाव कोरले.
पुरुषांच्या स्पर्धेत जोकोविच उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे पुन्हा एकदा विम्बल्डनमध्ये स्पेनचा अल्काराज आणि इटलीचा सिनेर आमनेसामने येणार हे स्पष्ट झाले. समस्त टेनिसप्रेमींना फ्रेंच ओपनप्रमाणे पुन्हा एकदा टेनिसचा दमदार खेळ पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती. पहिला सेट जिंकून अल्काराजने सुरुवात तर चांगली केली, पण दुसऱ्या सेटपासून सिनेरने आपला खेळ उंचावत नेला. पुढे कुठलीही चूक न करता विम्बल्डन स्पर्धा जिंकायची अशा इराद्याने खेळ करायला सुरुवात केली. आपले उत्कृष्ट पदलालित्य, बँक हॅन्ड, फोर हॅन्डचे जोरदार फटके, बिनतोड अशी जोरदार सर्व्हिस, यासोबतच खोलवर मारलेले क्रॉस फटके यांच्या जोरावरती अल्काराजला सामन्यांमध्ये वरचढ होऊ दिले नाही. दुसरा आणि तिसरा सेट 6-4 च्या फरकाने जिंकल्यानंतर सिनरचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला. चौथ्या सेटमध्ये अल्काराजने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सिनरचे इरादे पक्के होते. फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये जे गमावले ते ब्रिटिश विम्बल्डनमध्ये कमावून त्या पराभवाचा बदला घेण्याची ईर्षा त्याच्यामध्ये जागी होती. त्यामुळे खेळावरची आपली पकड अधिक घट्ट केली आणि पुन्हा चौथा सेट 6-4 च्या फरकाने जिंकून विम्बल्डनच्या सोनेरी चषकावरती आणि आपल्या पहिल्या विम्बल्डन जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
1968 मध्ये टेनिसच्या व्यावसायिक खेळाचा प्रारंभ होऊन आता जवळपास 57 वर्षे पूर्ण झाली आहेत. टेनिस आता व्यावसायिकता, अतिउत्तम फिटनेस, शारीरिक तंदुरुस्ती आणि अधिक तंत्रशुद्धता, तसेच अफाट पैसा, प्रसिद्धी, यश, मानसन्मान, लोकप्रियता मिळवून देणारा एक नितांत सुंदर असा खेळ आहे. व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र म्हणूनही तो उत्तम प्रकारे उदयास पावला आहे.
जुलै महिना इंग्लंडमध्ये ऋतू बदलाचा किंवा उन्हाळा सुरू होण्याचा कालावधी. या वेळी इंग्लंडमध्ये लाल गुलाबी रसरशीत स्ट्रॉबेरीचे उत्पादनही तयार झालेले असते. त्यामुळे या स्पर्धेपासून स्ट्रॉबेरी क्रिम खाणे हा एक आनंदाचा आणि उत्सवाचा भाग ठरलेला आहे व ती प्रथा विम्बल्डनसोबत स्ट्रॉबेरी क्रीमचा आनंद घेणे आजतागायत चालू आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंना पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे लागतात. पांढरा रंग हा इंग्लंडमध्ये उन्हाळ्याचा रंग मानला जातो. त्यासोबतच गर्द हिरवा आणि जांभळ्या रंगाचा स्पर्धेच्या स्टेडियमसाठी वापर करण्याचे ठरवले गेले. विम्बल्डनचा बक्षीस समारंभ पूर्वी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते, तर आता प्रिन्स विल्यम यांच्या पत्नी प्रिन्सेस केट मिडलटन यांच्या हस्ते केला जातो. विम्बल्डन स्पर्धा मती गुंग करणारी. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आपले संपूर्ण राजशिष्टाचार, खानदानी राजपरंपरा पाळून, कुठे उणे नाही की अधिक नाही अशाच रीतीने संपन्न होतो, पण दरवर्षी तो पुनः पुन्हा पाहत रहावा असा वाटतो आणि रसिकांना प्रत्येक वर्षी एक वेगळाच आनंद देऊन जातो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List