माणिकराव रमी ट्रपमध्ये कारवाईची टांगती तलवार
शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून विधिमंडळ अधिवेशनात जंगली रमी खेळणाऱया कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱया ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱयांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेतला. त्यामुळे मंत्री झाल्यापासून सातत्याने वादात अडकणाऱया माणिकराव यांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रमीत रमलेल्या कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जंगली रमीचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात जंगली रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी मी जाहिरात स्कीप करत होतो. रमी खेळत नव्हतो असा खुलासा केला. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी
ऑनलाइन रमी खेळतानाचे त्यांचे आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केल्याने कृषीमंत्री कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
तटकरे यांच्याकडून कारवाईचे संकेत
शेतकरी संकटात असताना कृषीसारखा महत्त्वाचा आणि संवेदनशील विभाग असणाऱया मंत्र्याने योग्यप्रकारे शेतकऱयांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. कोकाटेंकडून घडलं ते अयोग्य होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे स्पष्ट करत अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
रमी खेळतानाचा व्हिडीओ योग्य नाही – मुख्यमंत्री
विधिमंडळाचे सभागृह चालू असताना आपल्या विभागाचे काम नसेल तर मंत्री कामकाजाकडे दुर्लक्ष करतात हे चुकीचे आहे. कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ योग्य नाही. मंत्र्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आणखी किती पुरावे हवे सांगा
मी जंगली रमी खेळत नव्हतो जाहिरात स्कीप करत होतो, असा दावा कृषीमंत्री कोकाटे यांनी केला होता. मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन नवे व्हिडीओ पोस्ट करत कोकाटे यांना उघडे पाडले आहे. त्यामध्ये कोकाटे यांनी बोटाने कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला हे स्पष्टपणे दिसत आहे. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय!, असा संताप आव्हाड यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या विधिमंडळातील ऑनलाइन रमी खेळतानाच्या व्हिडीओवरून व्यक्त केले.
कोकाटे आज घेणार पत्रकार परिषद
जंगली रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये झाल्या प्रकाराबद्दल ते माफी मागणार की राजीनामा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाण यांचा राजीनामा
छावा संघटनेच्या पदाधिकाऱयांना मारहाण करणारे अजित पवार गटाने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर सुरज चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. दरम्यान अजित पवार यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. पक्षाच्या मुल्यांविरोधात जाऊन केले जाणारे वर्तन स्वीकारले जाणार नसल्याचे एक्स पोस्ट करत स्पष्ट केले आहे.
आणखी 2 व्हिडीओ
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यामध्ये कोकाटे रमी खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List