‘डॉन 3’ ला नायक मिळाला; मात्र खलनायक मिळेना
रणवीर सिंगच्या हा ‘डॉन 3’ मध्ये मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटातील खलनायकाबद्दल मात्र माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. अलिकडेच चित्रपटातील खलनायकासाठी ‘बिग बॉस विजेता करण वीर मेहरा’चे नाव पुढे आले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी अद्याप खलनायकासाठी कोणत्याही अभिनेत्याला आत्तापर्यंत पसंती दर्शवली नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून फरहान अख्तर 15 वर्षांनी दिग्दर्शन करण्यासाठी परतणार आहे.
फरहान अख्तर दिग्दर्शित करत असलेल्या ‘डॉन 3’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून नानाविध बातम्या समोर येत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये रणवीर सिंग असणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर झालेले आहे. रणवीर यामध्ये नवीन डॉनची भूमिका साकारत आहे आणि कृती सॅननला मुख्य नायिका म्हणून निवडण्यात आले आहे. परंतु उर्वरित कलाकारांबद्दल मात्र सोशल मीडियावर अनेक अफवा ऐकायला मिळत आहेत.
पिंकव्हिलाच्या एका नवीन अहवालानुसार, करण वीर मेहरा डॉन 3 मध्ये सामील होण्याच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. खरं तर खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याचा विचारही केला जात नाही. रणवीर सिंगसोबत विलनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता विक्रांत मेसीशी चर्चा सुरू होती. परंतु निर्मात्यांकडून मात्र त्याला पसंती मिळाली नाही.
सध्या चित्रपटाच्या मुख्य खलनायकासाठी कास्टिंग प्रक्रिया सुरू आहे. असे वृत्त आहे की, निर्माते अशा तरुण अभिनेत्याच्या शोधात आहेत जो या अॅक्शन-पॅक्ड भूमिकेमध्ये अभिनयासह त्याची उत्तम छाप पाडू शकेल. बॉलिवूड आणि बाहेरून अनेक नावे विचारात घेतली जात आहेत, परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आतापर्यंत, डॉन 3 च्या अधिकृत स्टारकास्टमध्ये फक्त रणवीर सिंग आणि कृती सॅननची नावे समाविष्ट आहेत.
2011 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांचा ‘डॉन 2’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून आहे. ‘डॉन 3’ सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे, त्याचे शूटिंग जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित ‘डॉन 3’ 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List