पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण, मूळगावी लष्करी इतमात होणार अंत्यसंस्कार
पानीव गावचे सुपुत्र आणि हिंदुस्थानी लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर (55) यांना रविवारी मध्यरात्री 1 वाजता कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले. बाबर यांच्या निधनामुळे पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गावाने एक शूर, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे. बाबर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे. बाबर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचेल तिथून लष्करी वाहनाने मध्यरात्रीपर्यंत पानीव गावात दाखल होईल. बुधवारी सकाळी 10 वाजता लष्करी इतमामात पानीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पानीव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली.
गेल्या 35 वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते. देशसेवेच्या पवित्र कार्यात तन-मनाने समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले.
वीर जवान यशवंत बाबर यांचा सैनिकी प्रवास
बाबर यांनी जम्मू व काश्मीर येथे सलग 15 वर्षे देशसेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्याने सेवा बजावली. त्यानंतर जैसलमेर (राजस्थान), पुणे येथे प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या, सिकंदराबाद (आंध्रप्रदेश), जबलपूर (मध्यप्रदेश) येथे कर्तव्य बजावले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कोची (केरळ) येथे झाली होती, जिथे ते 1307 DSC PL OSS मध्ये सेवा बजावत होती. येणाऱ्या एका वर्षात ते लष्करातून सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List