कितीही संकटे येवोत, ती परतून लावण्याची ताकद शिवसैनिकांच्या निष्ठेत आहे; बबनराव थोरात यांचा विश्वास
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा इमानदार लोकांचा पक्ष आहे. मराठी मातीचा स्वाभिमान जपणारी आपण माणसं आहोत. संकटे येतात, जातात. कितीही आव्हाने येवोत, ती परतून लावण्याची ताकद भगव्याच्या निष्ठेत आहे. मातोश्रीशी इमान राखून राबणार्या कडव्या शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना पुढेच जाणार असून निव्वळ पद व पैशांसाठी भामट्या भाजपा सोबत गेलेल्या बेईमानांचे हाल केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केला.
मेळाव्यात उपस्थित असंख्य शिवसैनिकांना तडखेबंद मार्गदर्शन करत बबनराव थोरात यांनी आजचा दिवस गद्दारांच्या छातीत धडकी भरवून आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाला उभारी देण्याचा संकल्प करण्याचा असल्याचे सांगितले. हा जल्लोषपूर्ण मेळावा सत्तेतील मस्तवाल राजकारण्यांना जागे करण्यासाठी देखील महत्वपूर्ण असल्याचे थोरात म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले आता अस्वस्थ आहेत. राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर उभे ठाकलंय. बेईमानांना पद, पैसा मिळालाय पण लोकांचा मान सन्मान मिळत नाही. त्यामुळे जनता आजही निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभे आहे. त्यामुळे शिवसेना सदैव स्वाभिमानाने पुढे जात राहील याबद्दल निश्चिन्त राहा, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
आजघडीला नांदेडमध्ये पिण्याचे पाणी रोज येत नाही. विजेचा लपंडाव सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्व शिवसेना पदाधिकार्यांनी वार्डावार्डात जावून जनजागृती करत नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. उत्तर व दक्षिणमधील गद्दारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपाच मागे लागलीय. कुणीही आव्हान देवो ते परतून लावण्याची ताकत आपल्या निष्ठेत आहे. तुम्ही झुकू नका, वाकू नका, काम करत रहा. नांदेडकर जनता महापालिका, जिल्हा परिषद व इतरही निवडणुकीत लबाडांना चित करून शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विजयी जयजयकार करतील, असेही थोरात म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार अनुसया खेडकर, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, जिल्हा समन्वयक भाऊसाहेब कदम, शहरप्रमुख आनंदराव जाधव, अर्जुन ठाकूर, जित्तूसिंह टाक, नांदेड दक्षिणचे शहर महानगरप्रमुख मनोज यादव, माजी संपर्कप्रमुख धोंडू पाटील, तालुकाप्रमुख सुनिल कदम, नंदू वैद्य, डॉ.बी.डी.चव्हाण, डॉ.निकिता चव्हाण, नवज्योतसिंघ गाडीवाले, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, वसिम भाई देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना प्रकाश मारावार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिर गौतम पवार यांनी केले. यावेळी युवा उद्योजक धनराजसिंग भगिले यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह पक्षात प्रवेश केला. यासोबतच मुखेड, देगलूर भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी स्वागत केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List