उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव सोमवारी अचानक राजीनामा दिला. आपल्याला प्रकृती अस्वास्थ जाणवत असून आता आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी राजीनामा देत असल्याचे 74 वर्षीय धनखड यांनी म्हटले आहे. ते 2022 पासून उपराष्ट्रपती पदावर होते. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क करण्यात येत आहेत. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच गृहमंत्रालयानेही याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी राजीनामा देणे हे खूपच आश्चर्यकारक आहे. दिवसभर ते राज्यसभेत उपस्थित होते, जिथे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरून सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादविवाद झाला. नंतर त्यांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाची बैठक बोलावली. त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार आले नाहीत. यानंतर, संध्याकाळी उशिरा जगदीप धनखड यांनी राजीनामा जाहीर केला. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती 17 जुलै रोजी दिल्लीतील एका सरकारी कार्यक्रमादरम्यान बिघडली होती. ते पत्नी आणि दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासोबत वाटिका दौऱ्यावर होते. तेव्हा भोवळ येऊन ते अचानक स्टेजवर पडले. त्यानंतर, त्यांना आधार देत बाहेर काढण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंगळवारी स्वीकारला आहे. आता यानंतर गृह मंत्रालयानेही धनखर यांच्या राजीनाम्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांचा राजीनामा पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आणि गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List