एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दीड हजार महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रात्री-अपरात्री डय़ुटी संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना घरी किंवा रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जात नाही. एपंदरीत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत व्यवस्थापन गंभीर नसल्याचे दिसत आहे.
मुंबई विमानतळावरील एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये अंदाजे दीड हजार महिला कर्मचारी शिफ्ट डय़ुटीमध्ये काम करतात. महिला कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा व्यवस्थापनाकडून दिल्या जात नाहीत. युनिफॉर्म बदलण्यासाठी चेंजिंग रूम नसल्यामुळे त्यांना वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलावे लागतात. विश्रांती आणि जेवणासाठी रेस्ट रूमची सुविधा नाही. महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा कामावरून सोडले जाते तेव्हा त्यांना रेल्वे स्टेशनला किंवा घरी सोडण्यासाठी वाहनाची सुविधा दिली जात नाही.
मोर्चाच्या एक दिवस आधी हा मुद्दा पोलीस उपायुक्तांसमोर उपस्थित झाला होता. त्या वेळी व्यवस्थापनाचे अधिकारी महेश कांबळे यांनी याबद्दल दोन दिवसांत लेखी नोटीस काढण्यात येईल, असे सांगितले होते. मोर्चानंतरसुद्धा महेश कांबळे आणि सुनीता भारद्वाज यांनी महिला कर्मचाऱ्यांचे विषय सोडवतो, असे मान्य केले होते. त्यांच्याशी पुन्हा बैठक घेतली असता त्यांनी याविषयी असमर्थता दर्शवली.
व्यवस्थापनाची दादागिरी मोडून काढू
दरम्यान, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांना याबद्दल कळवले आहे. अधिवेशनात एआय एअरपोर्ट सर्विसेसमधील फिक्स टर्म कंत्राटी कामगारांचा विषय घेऊन व्यवस्थापनाची दादागिरी मोडून काढून कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List