संविधानाची पायमल्ली सुरू आहे; मतदारयादी फेरनिरीक्षणावरून तेजस्वी यादवांचा निवडणूक आयोगावर निशाणा
बिहारमधील निवडणुका जवळ येत असल्याने वातावरण तापले आहे. निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असून त्यांच्याकडून संविधानाची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी फेरनिरीक्षणावरून विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर भाजपची बाजू घेतल्याचा आरोप केला आहे. आयोगाने विरोधकांना भेटण्यास नकार देत संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष फेरनिरीक्षणावरून विरोधी पक्षांमध्ये नाराजी वाढत आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आयोगावर भाजपच्या बाजूने काम करण्याचा आरोप करत ते म्हणाले की लोकशाही संपवण्याचे षड्यंत्र आहे. निवडणूक आयोग संविधानाची पायमल्ली करत आहे.
आम्ही आमच्या शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाला भेटण्याची विनंती करत आहोत, परंतु ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यात विरोधी पक्षांना आयोगाला भेटण्यासाठी वेळ दिला जात नाही हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाची ही वृत्ती संविधानाचे उल्लंघन आहे आणि यापूर्वी कधीही असे झाले नाही, असेही ते म्हणाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, परंतु आतापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग विरोधी आघाडीच्या शिष्टमंडळाला भेटण्यास तयार नाही. परंतु प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे भेटू इच्छित आहे, हे अयोग्य आहे. हे का केले जात आहे? असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, तर ती भाजपची आयोग बनली आहे. भाजप आणि नितीश कुमार यांचे मौन हे सिद्ध करते की त्यांना निवडणूक हरण्याची भीती आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोग त्यांच्यासाठी काम करत आहे. निवडणूक आयोग कठपुतळी बनला आहे. मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे आणि निवडणूक आयोग राजकीय पक्षांसोबत बैठका घेत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? पंतप्रधान मोदी आणि इतर प्रमुख नेत्यांच्या भाषणांवर निवडणूक आयोगाने कधीही कोणतीही कारवाई केलेली नाही, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List