संगमेश्वरमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या मोरीला तडे, रस्त्याला धोका; निकृष्ट कामांमुळे जनता संतप्त
संगमेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयासमोर छोट्या मोरीसाठी जे मजबुतीकरण करण्यात आले आहे, त्या स्लॅबलाच तडे गेल्याचे नुकतेच निदर्शनास आले असून, हे बांधकाम धोक्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
सध्या या तड्यांमधून पावसाचे पाणी झिरपत असून, त्यामुळे भिंत अधिकच कमजोर होत आहे. सदर रचना कोसळल्यास त्यालगतचा महामार्ग रस्ता, जो आधीच नादुरुस्त असून तात्पुरत्या डागडुजीवर तग धरून आहे. तो आता पुन्हा खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
कुरधुंडा, आरवली आणि शास्त्रीपुल परिसरातही अशा प्रकारचे तडे जाण्याची, रस्ता खचण्याची आणि भिंती ढासळण्याची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना मान्सूनच्या पहिल्याच सरींमध्ये उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठेकेदार फक्त वरवरची मलमपट्टी करून जबाबदारी झटकतो आहे. तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंटचं लेपन करून फोटो काढले जातात, पण अंतर्गत दोष दडवले जात आहेत.बावननदी ते आरवली दरम्यानचा महामार्ग, जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत येतो तो दर्जेदार आणि दीर्घकालीन वापरासाठी उभारला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या घटनांनी हा महामार्ग “राष्ट्रीय” दर्जा राखू शकेल का?” असा प्रश्न निर्माण केला आहे.
या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी होत आहे. “प्रशासन वेळेत जागं झालं नाही, तर उद्रेक अटळ आहे,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने घटनास्थळांची पाहणी करून बांधकामाची सखोल तपासणी करावी, आणि संभाव्य धोका ओळखून तांत्रिक समितीमार्फत स्थायिक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List