शहापूरच्या दापूरमाळमध्ये ‘झोळी अॅम्ब्युलन्स’, रस्ताच नसल्याने रुग्णाची 10 किमी फरफट, गावकऱ्यांनी चिखल तुडवत रुग्णालय गाठले
सत्ताधारी भाजप महासत्तेच्या गमजा मारत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासींना अजूनही नरकयातनाच भोगाव्या लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहापूरच्या दापूरमाळ पाड्यातील चिमा पारधी या वृद्धाची अचानक तब्बेत बिघडल्याने गावकरी तसेच नातेवाईकांनी झोळीत टाकून त्यांना रुग्णालयात नेले. मात्र यासाठी ग्रामस्थांना डोंगर, दऱ्यातून चिखल तुडवत तब्बल दहा किमीचा प्रवास करावा लागला. अशा अनेक आदिवासी वाड्यांमध्ये रस्ता नसल्याने वर्षानुवर्षे झोळी अॅम्ब्युलन्सचा आधार घ्यावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या हा पाडा सुमारे 100 वर्षांपूर्वी वसलेला आहे. मात्र येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांवर दवाखाना, बाजारहाटसाठी 8 ते 10 किलोमीटर पायी चालून कसारा गाठण्याची वेळ येत आहे. रस्ता नाही, लाईट नाही त्यामुळे अचानक आलेली आपत्ती, घटना असेल तर मोठा प्रश्न उपस्थित होतो.
आज दापूरमाळ येथे राहणारे चिमा पारर्धा या वृद्ध ग्रामस्थाची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णाल यात आणण्यासाठी नातेवाईकांनी डोली तयार करून दहा किमीची पायपीट केली. मात्र हा प्रवास भयंकर होता. वाटेत पाच किमी अंतरावर वादळामुळे पडलेल्या झाडामुळे पायवाटही बंद झाली होती. गावकऱ्यांना मोठी कसरत करत पारधी यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. त्यानंतर माळ गावातून चिमा पारधी यांना खासगी वाहणाने इगतपुरी येथे रुग्णालयात दाखल केले.
आपल्या देशाचा स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा झाला परंतु आमच्या गावाचा विकास काही होईना.. एखादी महिला गर्भवती राहिली की तिला खबरदारी म्हणून तिच्या नातेवाईकांकडे ठेवावे लागते. वयोवृद्ध, आजारी असलेल्या माणसांना नातेवाईकांकडे नेऊन ठेवावे लागते. ही अत्यंत खेदाची बाब आहे.
अनंता वारे, अजनूप. ग्रामपंचायत सदस्य.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List