डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली
नोकरदार मंडळींना दुपारचे जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली आहे. प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कात 200 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासून दरवाढ लागू असेल. महागाई व प्रवासातील जोखीम यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचे मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
मुंबईच्या डबेवाल्यांनी वक्तशीरपणाचे व्रत अंगीकारत डबे पोहोचवण्याचे काम केले आहे. ग्राहकांचा विश्वास जपत डबेवाले अखंड सेवा देत आहेत. जर डबा घ्यायच्या ठिकाणापासून डबा देण्याचे ठिकाण अर्थात कार्यालय पाच किमी अंतरावर असेल तर त्या सेवेसाठी जुन्या दरानुसार मासिक 1200 रुपये घेतले जात होते. त्यापुढे सेवा द्यायची असेल तर डबेवाल्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येकी 300 ते 400 रुपये आकारले जात होते.
महागाईमुळे शुल्क वाढवले
सुधारित दरानुसार मासिक सेवा शुल्कात 200 रुपयांची वाढ केली आहे. दरवाढीचा निर्णय भावनिकदृष्टय़ा कठीण होता. मात्र वाढत्या महागाईचा विचार करून आम्हाला सेवाशुल्क वाढवावे लागले आहे. मुंबईकरांचा आमच्या सेवेवर विश्वास असल्यामुळे ते दरवाढीनंतरही तोच प्रतिसाद कायम ठेवतील, असा आशावाद डबेवाल संघटनेचे प्रवत्ते विष्णू काळडोके यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List