मिंध्यांनी मुंबई महापालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावी लागेल; आदित्य ठाकरे कडाडले
पावसाळा सुरू झाला असला तरी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. नालेसफाईदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कामाचा घोळ आणि घोटाळा आता जनतेसमोर आला आहे, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. मिंधे यांनी रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे आपण सांगत होतो, ते आता जनतेसमोर आले आहे. मिंधे यांनी मुंबई महापालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड निवडणुका घेत दूर करावीच लागेल, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई खड्डेमुक्त आणि पूरमुक्त करण्याचे खोटे आश्वासन मिंधे यांनी दिले होते. मात्र, रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. यातून फक्त त्यांच्या लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरले गेले आहेत.नालेसफाईचा दावा करण्यात येत असला तरी मुंबईतील परिस्थिती आपल्यासमोर आहे. तसेच पुण्यातही पावसाने पाणी साचल्याचे दिसत होते.याआधी परिस्थिती होत नव्हती. त्यामुळे निवडणुका घेत मिंधे यांनी महापालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावी लागेल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आपल्याकडे महापालिका असताना पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पारदर्शकपणे पूर्ण करण्यात येत होती. तसेच आम्ही प्रत्येकवेळी आढावा घेत होतो. मात्र, आता तीन वर्षात जनतेने समस्या कोणाकडे मांडयच्या अशी परिस्थिती आहे. लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरणे, पक्षांची फोडाफोडी हे सर्व सुरू आहे. मात्र, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडे वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात एसंशि यांनी मुंबईचा पैसा लुटला आहे, त्याची न्यायालयाकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
पहलगाम हल्ल्याबाबत भाजप नेत्यांकडून लज्जास्पद वक्तव्ये करण्यात येत आहे. त्यांनी अनेकांचा अपमान केला आहे. या गंभीर मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, भाजपनेते बेताल वक्तव्ये करत आहे. यातून त्यांच्या मनात आहे, तेच त्यांनी मांडले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या मोठ्या क्रमांकाची ठरली असली तरी देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List