स्मरण- लेखक-कलावंतांची भूमिका
>> डॉ. मुकुंद कुळे
समाज आणि समाजाच्या प्रश्नांबद्दल बोलणाऱया साहित्यिक-कलावंतांच्या धारेतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी. मराठी साहित्यात यशस्वी गूढकथाकार-ललित लेखक आणि रंगभूमीवरील यशस्वी नाटककार अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केल्यावरही रत्नाकर मतकरी यांनी समाजाशी असलेली स्वतःची नाळ तुटू दिली नाही. कधी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, कधी आपल्या नाटय़कृतींतून तर कधी प्रत्यक्ष आंदोलनात उतरून आपली सामाजिक-वैचारिक बांधिलकी स्पष्ट केली. तसंच वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भूमिका घेताना त्यांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक-सांस्कृतिक नुकसानीची पर्वा केली नाही. महत्त्वाचं म्हणजे, एकदा घेतलेली भूमिका त्यांनी प्रसंगपरत्वे बदललेली नाही. यामुळे कदाचित त्यांचे काही पुरस्कार हुकलेही असतील, परंतु त्यामुळे त्यांचं अडलं नाही. आपली लेखनकामाठी करत ते जागल्याची भूमिका बजावत राहिले, घुंगुरकाठी वाजवत राहिले.
प्रसिद्ध लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांचं कोरोना काळात निधन झाल्याला येत्या 17 मे रोजी पाच वर्षं पूर्ण होतील. त्यांच्या मृत्यूपश्चात गेल्या पाच वर्षांत त्यांच्या विविध साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आणि अजून काही होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी इतकं विपुल लेखन करून ठेवलेलं आहे की, जणू काही लेखन हेच त्यांचं जीवनव्रत असावं. मात्र हे लेखन-जीवनव्रत त्यांनी कसबीपणाने निभावलं. कसबीपणाने यासाठी की त्यांनी केवळ इतरांसारखंच कल्पनागम्य-रम्य लिहिलं असतं तरी त्यांना कुणी काही बोललं असतं असं नाही. पण केवळ कल्पनागम्य न लिहिता त्यांनी समाजाच्या घडणीसाठी लेखन केलं. तसंच आपली लेखनकला त्यांनी सामाजिक-राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीदेखील वापरली.
लेखक-कलावंताने आपल्या कलेबद्दल, कलेतील प्रयोगांबद्दल बोललं पाहिजे. तसंच त्याने समाज आणि समाजाच्या प्रश्नांबद्दलही बोललं पाहिजे. कारण तोही या समाजाचाच एक भाग असतो. मात्र सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भूमिका घेणं, किमान त्याविषयी चारचौघांत आपलं मत व्यक्त करणं हे सर्वसामान्यांसाठी जितकं सोपं असतं तेवढंच ते साहित्यिक-कलावंतांसाठी जिकिरीचं असतं. कारण लेखक-कलावंताला समाजमान्यतेबरोबरच राजमान्यताही हवी असते. परिणामी, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर गुळणी धरून बसणंच बऱयाचदा साहित्यिक-कलावंत पसंत करतात; परंतु त्याच वेळी आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱया समाजाचं आपण काही देणं लागतो आणि ते फेडण्यासाठी तरी आपल्याला विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका घ्यायला हवी हे ते सोयीस्करपणे विसरतात.
अर्थात याला दुर्गा भागवत, गं. बा. सरदार, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, विंदा करंदीकर यांच्यासारखे काही सन्मान्य अपवादही असतात. ज्यांना आपल्या सामाजिक बांधिलकीपेक्षा आपलं लेखक किंवा कलावंत असणं कधीच मोठं वाटलं नाही. त्यामुळेच परिणामांची पर्वा न करता त्यांनी कायम समाजहिताचीच भूमिका घेतली. कधी राजकारण्यांना दुखावून, तर कधी प्रत्यक्ष समाजालाही दुखावून. कारण भावनेपेक्षा बुद्धीची कसोटी त्यांनी नेहमीच महत्त्वाची मानली. यातला प्रत्येक जण विविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भूमिकांसंदर्भात रस्त्यावर उतरला असं नाही; पण त्याने आपली भूमिका कधी लेखनातून, तर कधी बोलण्यातून व्यक्त केली आणि आपण समाजाबरोबर असल्याचं दाखवून दिलं.
याच धारेतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी! मराठी साहित्यात यशस्वी गूढकथाकार-ललित लेखक आणि रंगभूमीवरील यशस्वी नाटककार अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केल्यावरही रत्नाकर मतकरी यांनी समाजाशी असलेली स्वतःची नाळ तुटू दिली नाही. किंबहुना, संधी मिळेल तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे त्यांनी कधी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, कधी आपल्या नाटय़कृतींतून, तर कधी प्रत्यक्ष आंदोलनात उतरून आपली सामाजिक-वैचारिक बांधिलकी स्पष्ट केली. तसंच वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भूमिका घेताना त्यांनी आपल्या वैयक्तिक सामाजिक-सांस्कृतिक नुकसानीची पर्वा केली नाही. महत्त्वाचं म्हणजे एकदा घेतलेली भूमिका त्यांनी प्रसंगपरत्वे बदललेली नाही. यामुळे कदाचित त्यांचे काही पुरस्कार हुकलेही असतील, परंतु त्यामुळे त्यांचं अडलं नाही. आपली लेखन कामाठी करत ते जागल्याची भूमिका बजावत राहिले. घुंगुरकाठी वाजवत राहिले. त्या घुंगुरकाठीचा नाद किती लोकांपर्यंत पोहोचला हा भाग अलाहिदा! पण समाजमनाला-राजकारण्यांना कुणी तरी सातत्याने असे धक्के देत राहावं लागतं, समाजातील आणि राजकारणातील ठेकेदारांची ही अल्प थरथरही सामाजिक-राजकीय बदलासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. मात्र त्यासाठी कुणी तरी त्यांना सातत्याने पराणी टोचत राहावं लागतं. हे पराणी टोचण्याचंच काम रत्नाकर मतकरी हयात असताना सातत्याने करीत होते.
मतकरी यांच्या या सतत ‘भूमिकाशील’ असण्याला खूप महत्त्व आहे. कारण स्वतःला ज्ञानवंत-विचारवंत-कलावंत म्हणवणारे अनेक जण बऱयाचदा हस्तिदंती मनोऱयात बसूनच सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या गप्पा मारत असतात आणि त्याविषयी लिहीत असतात, तर कित्येक जण हा आपला विषय नाही, असं म्हणून आपली सामाजिक जबाबदारी झटकत असतात. पण ज्ञानवंत व विचारवंतांवरच समाजाची खरी जबाबदारी असते, असं प्रसिद्ध साहित्यिक-विचारवंत गं. बा. सरदार यांचं मत होतं. ते म्हणायचे- “ज्ञान हे जीवनातील एक प्रचंड सामर्थ्य बनून राहिल्याने समाजावर होणाऱया चांगल्या-वाईट परिणामांबद्दल विचारवंतांना उदासीन राहून चालणार नाही. ज्ञानानंद किंवा विद्यानंद हा आत्मनिष्ठ व अलौकिक आहे हे मान्य केले, तरी विद्याभिवृद्धीचा सामाजिक संदर्भ, त्यासाठी खर्ची पडलेले सामूहिक श्रम व संपत्ती यांचा विचार लौकिक दृष्टीनेच करावा लागेल. ज्ञानाची निर्मिती, विकास आणि प्रसार ही कार्ये सातत्याने चालू राहावयाची असतील तर विद्यावंतांना आपली सामाजिक जबाबदारी टाळता येणार नाही.’’
गं.बा. सरदार यांनी म्हटल्याप्रमाणेच रत्नाकर मतकरी यांनी ज्ञानवंत-कलावंत असूनही नेहमीच आपली सामाजिक जबाबदारी उचलली आणि त्यानुसार गिरणी कामगारांचा प्रश्न, नर्मदा आंदोलन, साहित्य संमेलनांना वाटल्या जाणाऱया शासकीय खिरापती, साहित्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांची असांस्कृतिक उठबस, भाषेविषयी-संस्कृतीविषयी समाज आणि राजकारण्यांत असलेली उदासीनता, निवडणुकांतला घोडेबाजार, अशा विविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रश्नांवर वेळोवेळी भूमिका घेत लेखन करीत राहिले. म्हणजेच ते आपल्या विचारांची अभिव्यक्ती करीत राहिले नि त्यातून सर्वसामान्यांना आणि राजकारण्यांनाही दिशादर्शन करण्याचा प्रयत्न केला. तसंच राजकारण असो, समाजकारण असो वा संस्कृतिकारण, जे अन्याय्य आणि अनिष्ट वाटलं किंवा ज्याच्यावर आपण बोलायलाच पाहिजे असं मतकरींना वाटलं, तेव्हा ते आपली भूमिका निर्भीडपणे मिळेल त्या अवकाशात मांडत राहिले.
मुळात आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर आपण समाजाशी जोडलेले आहोत याचं मतकरींचं भान सुटलं नाही. त्यामुळेच अनेकदा स्वयंप्रेरणेतूनच ते समाजात मिसळत गेले आणि समाजाचे प्रश्न जाणून घेत राहिले. उदाहरणार्थ, त्यांनी रिमांड होम-हॉस्पिटलमध्ये, लहान मुलांचे वॉर्ड, झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी लहान मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्माशिम्मा राक्षस’ किंवा बालमजुरांविषयीचे ‘2 बच्चे, 2 लुच्चे’ अशा बालनाटय़ांचे प्रयोग केले. पालकवर्गाला आवाहन करून मुलांचे वाढदिवस साधेपणाने साजरे करायला लावून, वाढदिवसासाठी येणाऱया खर्चातून रिमांड होममधल्या मुलांना त्यांच्या आवडीचं नाटक बघायला मिळेल असंही बघितलं आहे. यासाठी काही ठिकाणी अगदी ट्रकचा रंगमंच उभारूनही बालनाटय़ं केली आहेत. कलावंताला-साहित्यिकाला असं सामाजिक भान असणं आणि त्याने ते वेगवेगळ्या उपक्रमांतून व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. मतकरी यांनी हे भान आपल्या अभिव्यक्तीतून वेळोवेळी दाखवून दिलं. केवळ सामाजिक उपक्रमांतून नाही, तर मतकरीनी आपल्या नाटय़कृतींतूनही हे भान जपलं. ‘लोककथा-78’सारख्या नाटकातून त्यांनी आदिवासी समाजावर होणारे अत्याचार आणि वेठबिगारीला वाचा फोडली आहे. ‘गणेश गिरणीचा धैकाला’ या एकांकिकेत गिरणी कामगारांच्या प्रश्नाचा मागोवा घेतला आहे, तर ‘निर्भय बनो आंदोलन’च्या पार्श्वभूमीवर ‘बकासुर!’सारखं प्रतीकात्मक नाटक लिहिलं… आणि हे सारं कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी केलं.
म्हणजेच आपलं लेखन मग ते कोणत्याही प्रकारातलं असेल- कथा, कादंबरी, ललित लेखन किंवा छोटय़ा-मोठय़ांची नाटकं, प्रत्येक ठिकाणी मतकरींनी केवळ आपलं लेखक असणंच महत्त्वाचं नाही मानलेलं, तर लेखक हा एक जबाबदार नागरिक असतो हेदेखील त्यांनी सिद्ध केलं. त्यामुळेच जिथे जिथे आपल्या लेखणीतून सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडता येईल, तिथे तिथे त्यांनी आपली कलाकृती पणाला लावली… आणि हे त्यांचं लेखणी पणाला लावणं म्हणजे त्यांची अभिव्यक्तीच होती… समकाळाला सवाल करणारी!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List