अर्जुन खोतकरांचा वसुलीमॅन किशोर पाटील निलंबित, मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश; धुळ्यातल्या ‘जालना’कांडाने महाराष्ट्रात खळबळ
मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे धुळ्यातील वसुलीचे ‘जालना’कांड शिवसैनिकांनी उघडकीस आणताच राज्यात खळबळ उडाली असून खोतकर यांचा पीए किशोर पाटील याला आज निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री विश्रामगृहातील रूम नंबर 102चे कुलूप तोडले असता 1 कोटी 84 लाखांचे घबाड सापडले असून काल दिवसभरात किमान साडेपाच कोटी जमा झाले होते. त्यातील साडेतीन कोटी घेऊन किशोर पाटील पसार झाला. 15 कोटींचा हा सौदा होता. हे पैसे जालन्यात खोतकरांच्या गल्ल्यात जाणार होते, असे बोलले जात आहे.
अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह 11 सदस्य विकासकामांची पाहणी करण्यासाठी तीन दिवसांच्या धुळे दौऱ्यावर होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील एका खासगी हॉटेलच्या सभागृहात अंदाज समितीची बैठक बुधवारी दुपारी झाली. दरम्यान, या दौऱ्याच्या सहा दिवस आधीच अर्जुन खोतकर यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील याने गुलमोहर शासकीय विश्रामगृहात 102 नंबरची रूम बुक केली होती. विकासकामांमध्ये त्रुटी असल्याने कारवाई केली जाईल, अशी भीती दाखवून याच खोलीला राजरोज वसुलीचा अड्डा बनवण्यात आला. कालही एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे या खोलीत दिवसभरात सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या थैल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी पोहचवल्या. शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांना या वसुलीची कुणकुण लागली आणि या वसुलीकांडाचे बिंग फुटले.
एम-90 लिहिलेल्या पिशवीत 90 लाख!
शासकीय विश्रामगृहातील रकमेची मोजदाद होताना शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आणि महानगर उपप्रमुख नरेंद्र परदेशी हे पंच म्हणून उपस्थित होते. त्यांना या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, या खोलीत साडेपाच कोटी रुपये असल्याची तक्रार अनिल गोटे यांची आहे. प्रत्यक्ष खोलीत 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपये आढळले. हा सर्व सत्ताधाऱ्यांसाठी गैरव्यवहार आहे.
अंदाज समितीत सर्वपक्षीय सदस्य असले तरी सत्ताधारी पक्ष आणि या पक्षाशी निगडित असलेल्यांना देण्यासाठीच ही रक्कम शासनाच्या विविध विभागांकडून जमा करण्यात आली आहे. कारण खोलीमध्ये एका पिशवीवर ‘एम’ असा उल्लेख असून त्यापुढे 90 अशी सांकेतिक नोंद आहे. याचाच अर्थ त्या पिशवीतील 90 लाख रुपये धुळे महापालिकेचे होते. शासनाच्या प्रत्येक विभागाकडून या खोलीत पैसे गोळा करण्यात येत होते. या खोलीतून रिकाम्या तेरा पिशव्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. समितीतील सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना ही रक्कम दिली जाणार होती, अशी आमची माहिती असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
धुळ्यात आलेल्या समितीत कोण कोण?
अंदाज समिती प्रमुख अर्जुन खोतकर, समिती सदस्य काशीराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, सदाशिव खोत यांच्यासह विधिमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर आदींचा दौऱ्यात समावेश होता.
निष्पक्ष चौकशी समितीची गरज
शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मात्र या एसआयटीवर विश्वास नसल्याचे सांगितले. अजित पवार यांची एसआयटीमार्फत चौकशी झाली; पण त्यांना क्लीन चिट मिळाली. मुख्यमंत्री फडणवीस क्लीन चिट देतात. धुळे प्रकरणाची तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
विधिमंडळाचीही चौकशी समिती
विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी असा उल्लेख करत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी किशोर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पाटील यांना निलंबित करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात येत आहे, असे राम शिंदे यांनी नमूद केले.
आतापर्यंत 100 कोटींची वसुली!
ज्यांच्या नावावर खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ईडी किंवा सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात अंदाज समितीच्या कुठे कुठे बैठका झाल्या. या पद्धतीने पैसे कसे जमा झाले, हे समोर यायला हवे. आतापर्यंत अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी जमा केल्याची माहिती आहे. सच्चे असाल तर त्यांना अटक करा, असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले. 15 कोटी अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. साडेपाच कोटी जमा झाले होते. उरलेले साडेनऊ कोटी पुढच्या दोन दिवसांत जमा होणार आहेत. ही रक्कम दिली नाही तर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करेन, गुन्हे दाखल करण्याची शिफारस करेन, अशी धमकी अर्जुन खोतकरांनी दिली होती. त्यानंतर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, असे संजय राऊत म्हणाले.
अंदाज समितीचे अध्यक्षच कोट्यवधी रुपये गोळा करतात. गुह्याचे ठिकाण शासकीय विश्रामगृह… ही अवस्था आहे या राज्याची. तुम्ही भ्रष्टाचारात सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत. भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही वाचवताय. कारण तुमचं सरकार भ्रष्टाचाराच्या या दलदलीतून निर्माण झालेले आहे, अशी तोफही संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर डागली.
पैशांच्या काही बॅगा पळविल्या
रूम नंबर 102 ही 15 ते 21 मे या कालावधीसाठी किशोर पाटील याच्या नावे आरक्षित करण्यात आली होती. मी विश्रामगृहात आलो त्या वेळी किशोर पाटील हा दोन बॅगा घेऊन पझेरो गाडीत बसून निसटला. खोलीत सापडलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम त्या बॅगांत निश्चित असेल, असा दावा अनिल गोटे यांनी केला. विश्रामगृहात सापडलेली रक्कम ही गंभीर बाब असून जी रक्कम पळवली गेली त्याचाही शोध लावला जावा, अशी मागणी गोटे यांनी केली.
पहाटे चारपर्यंत पैसे मोजत होते पोलीस
रूम नंबर 102बाहेर शिवसैनिकांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर.आर. पाटील, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, तहसीलदार वैशाली हिंगे विश्रामृहावर पोहचले.
रूमचे कुलूप तोडण्यात आले आणि रूममधील पैशांचे घबाड पाहून सगळेच चक्रावले. शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटांची बंडलं होती. इतकी मोठ्या प्रमाणात कॅश हाताने मोजणे शक्य नसल्याने मशीन मागवण्यात आल्या.
रात्री 12 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत तीन मशीनच्या साह्याने ही कॅश मोजण्यात आली. 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपये इतकी ही रोकड होती.
किशोर पाटील कोण?
किशोर पाटील गेल्या 20 वर्षांपासून शासकीय सेवेत आहे. विधानभवनात सहाय्यक पदावर तो कार्यरत आहे. प्रतिनियुक्तीवर तो सध्या अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक आहे. पाटील हा 2016 ते 2019 या कालावधीत अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना त्यांचा स्वीय सहाय्यक होता. 17-18 वर्षांपासून किशोर पाटील खोतकर यांच्यासोबत आहे.
दूध का दूध पानी का पानी झालेच पाहिजे ः मुख्यमंत्री
कोणी पैसे मागितले, कोण दोषी आहे… दूध का दूध पानी का पानी झालेच पाहिजे. विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे कदापि सहन करणार नाही. या घटनेची चौकशी एसआयटी नेमून करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनाही स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List