Pune News – आंबेगावमध्ये मुसळधार पाऊस, चास-घोडेगाव रस्त्यावरील पूल गेला वाहून
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास येथे सलग तीन ते चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील कामे ठप्प झाली आहेत. ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याने चास-घोडेगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.
चास येथे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे वीज वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक हैरान झाले आहेत. अवकाळी पावसामुळे चास परिसरातील शेतीचे बांध वाहून गेले आहेत. पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. चास ते घोडेगाव रस्त्यावर चिंचोली आणि चास गावाच्या वेशीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात मोरी टाकून पूल तयार करून वाहतूक सुरु करण्यात आली होती. परंतु ओढ्याला आलेल्या पुरात पुलाचा भरावा दुसऱ्यांदा वाहून गेला आहे. आणि रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली, असे भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे यांनी सांगितले.
पानमळावस्तीकडे जाण्यासाठी 37 लाख रुपये निधीतून पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी टाकण्यात आलेला भरावा मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. कोथींबीर, मेथी, फ्लावर, टोमेटो, कोबी, शेपू आदी पिकांत पाणी साचत आहे. त्यामुळे पिके सडू लागली आहेत. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बन्सी शेगर यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List