हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं…, वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडे?
Pravin Tarde on Vaishnavi Hagawane death: लव्ह मॅरेज, शाही थाटात लग्न… लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले पण नंतर मात्र वैष्णवी हगवणे हिच्यावर सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. पती, सासू, नणंद, सासरे यांच्या छळामुळे कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीने 9 महिन्यांच्या लगहान मुलाला मागे सोडत आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि नणंद यांना अटक केली आहे. फरार असलेले सासरे राजेंद्र आणि सुशील यांना शुक्रवारी म्हणजे आज अटक करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
फेसबूकवर पोस्ट करत प्रवीण तरडे म्हणाले, ‘हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॅापर्टया पेटवून द्या .. कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला..समाज म्हणुन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…’ अशी पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली आहे.
सांगायचं झालं तर, लग्नानंतर हगवणे कुटुंबियांनी वैष्णवी हिच्या आई – वडिलांकडून आलिशान कार, चांदीची भांडी आणि 52 तोळे सोनं मागितलं. हुंडा दिल्यानंतर देखील वैष्णवी हिचा सासरी छळ सुरुच होता. अनेकदा वैष्णवी हिने सासरचे त्रास देत असल्याचं देखील सांगितलं. अखेर 9 महिन्यांच्या बाळासोडून वैष्णवी हिने 16 मे रोजी आत्महत्या केली. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनादरम्यान वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या आहेत. शिवाय वैष्णवी हिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली…
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करणार आहे. किती दिवसाचं रिमांड बावधन पोलिसांकडून मागितली जाणार? राजेंद्र व सुशीलला कोणी मदत केली आणि ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे अशा अनेक कारणांसाठी पोलीस रिमांड मागणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List