Arjun Khotkar : शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत काय कांड?; त्या आरोपांवर मंत्री अर्जुनराव खोतकर यांची पहिली प्रतिक्रिया
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचे समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. तर आज सकाळी पत्र परिषद घेत संजय राऊत यांनी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये जमा करण्यात येणार होते. पैसे दिले नाही तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला. या सर्व प्रकरणात आता मंत्री अर्जुन खोतकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ती त्यांची जुनीच सवय
धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ही अर्जुन खोतकर यांच्या नावावर नोंद असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. तर खोतकरांवर गोटे यांनी सुद्धा गंभीर आरोप केला होता. आज पहाटे चार वाजेपर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. विधीमंडळाच्या अंदाज समितीसाठी ही रक्कम ठेवल्याचा आणि ही रक्कम समितीतील 11 आमदारांना देण्यात येणार असल्याचा आरोप गोटे यांनी केला होता. ही खोली किशोर पाटील यांच्या नावावर नोंद होती. ते खोतकर यांचे पीए आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आणि समितीला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन तर आखला नाही ना, असा सवाल खोतकरांनी केला आहे. आपण हे सर्व आरोप फेटाळत असल्याचे खोतकर म्हणाले. तर गोटे यांना असे आरोप करण्याची जुनी सवयच असल्याचा आरोप ही खोतकरांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. एकूण 29 आमदारांचा या समितीत समावेश आहे. तिचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. तर 11 आमदार धुळे दौऱ्यावर आहेत. तर या आमदारांना 5 कोटी रुपये देण्यासाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहावर आणल्याचा आरोप गोटे यांनी केला.
दरम्यान खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आली. गोटे यांनी पाच तास खोली क्रमांक 102 समोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यापूर्वी खोलीचे कुलूप कटरने तोडण्यात आले. तपासणीत या खोलीत 1 कोटी 84 लाख, 200 रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी पंचनामा करुन ही रक्कम जमा केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List