मुंबईच्या तलावांत 18 टक्केच पाणीसाठा, प्रचंड उकाड्यामुळे धरणांनी तळ गाठला
राज्यात अवकाळी पावसाचा जोर असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा वाढत्या उकाड्यामुळे झपाटय़ाने आटत चालला आहे. सातही तलावांमध्ये सध्या 2 लाख 61 हजार 277 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मुंबईला 60 दिवस पुरेल इतका असला तरी जून-जुलैमध्ये पावसाने दडी मारल्यास पाणीकपातीचे संकट येऊ शकते.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात तलावांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही तलावांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पावसाळा, वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते.
18 मे रोजी तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
- अप्पर वैतरणा 31,435
- मोडक सागर 41,331
- तानसा 22,786
- मध्य वैतरणा 34,915
- भातसा 1,19,886
- विहार 8,356
- तुळशी 2,567
राखीव साठय़ावर मदार
राज्य सरकारने आपल्या अखत्यारीतील भातसा व अप्पर वैतरणा तलावांमधून मुंबईला 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर राखीव साठा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईची मदार या राखीव पाणीसाठय़ावर असेल. यामुळे मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पुरेसे पाणी मिळेल.
तीन वर्षांतील 18 मेची स्थिती
- 2025 2,61,277 (18.05) टक्के
- 2024 1,76,026 (12.16) टक्के
- 2023 2,63,166 (18.18) टक्के
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List