जिथून गोळी आली ती प्रत्येक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडीओ
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्कराच्या तळांवर आणि सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर देत जिथून गोळी आली ती पाकिस्तानची प्रत्येक चौकी उद्ध्वस्त करून टाकली. पाकिस्तानला कशी अद्दल घडवली आणि चौक्या सोडून त्यांना कशा प्रकारे पळ काढावा लागला हे सांगतानाचा व्हिडीओ हिंदुस्थानी लष्कराच्या वेस्ट कमांडने ‘एक्स’वरून जारी केला आहे.
हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात 26 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हा बदला नाही, तर न्याय आहे. हा राग नाही, तर पाकिस्तानसाठी मोठा धडा असून भविष्यात त्यांच्या कित्येक पिढ्यांना याची कायमची आठवण राहील, असेही हिंदुस्थानी लष्कराने म्हटले आहे. व्हिडीओत हिंदुस्थानी लष्कराकडून पाकिस्तानच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. चौक्या उद्ध्वस्त केल्यानंतर उडालेल्या आगीचे लोळ आणि धुरांचे लोट दिसत आहेत.
प्लॅन, ट्रेन अॅण्ड एक्झिक्युटेड
व्हिडीओखाली ‘प्लॅन, ट्रेन अॅण्ड एक्झिक्युटेड’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओ सुरू झाल्यानंतर शिवतांडव स्तोत्र ऐकू येते. हातात रायफल्स घेतलेले जवान दिसतात. एक जवान ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सांगताना दिसतो. तो म्हणतो, ही सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्याने झाली. राग नाही, लाव्हा होता. डोक्यात फक्त एकच गोष्ट, यावेळी असा धडा शिकवू की, त्यांच्या पिढय़ा लक्षात ठेवतील. ही बदल्याची भावना नाही, तर न्याय होता. 9 मे, रात्री 9 वाजता दुश्मनच्या सैन्याने युद्धविरामाचे उल्लंघन केले. त्यांच्या चौक्या हिंदुस्थानी लष्कराने धुळीला मिळवल्या. दुश्मन आपल्या चौक्या सोडून पळताना दिसला.
- ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ एक कारवाई नाही, तर पाकिस्तानसाठी तो धडा होता जो त्यांना दशकांपासून मिळाला नव्हता… असे म्हणत सर्वजण शेवटी ‘जय हिंद’ घोषणा देताना व्हिडीओत दिसतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List