आरोग्य संपदा- सर सलामत तो…

आरोग्य संपदा- सर सलामत तो…

>> डॉ. चेतन वेदपाठक

स्मरणशक्ती हे निसर्गाने आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीस दिलेले एक अमूल्य वरदान आहे. स्मरणशक्ती हे आपल्या बौद्धिक क्षमतेचे एक अविभाज्य अंग आहे. आपले मस्तिष्क हे अनेक प्रकारचे ज्ञान साठवून ठेवत असते. ही साठवणुकीची प्रक्रिया जेवढी सुनियोजित आणि सुस्थितीत तेवढीच आपली स्मरणशक्ती तल्लख. काही दिवसांपूर्वी आलेल्या लास्ट अॅंड फाऊंड इंडेक्स अहवालानुसार लोकांमध्ये विसराळूपणा खूप वाढला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता शहरांमध्ये लोक सर्रास पासपोर्ट, चाव्या, मोबाइल, इयरपाड्स, पाकीट इत्यादी गोष्टी टॅक्सी अथवा अन्य ठिकाणी विसरून जातात. या विसरभोळेपणाबद्दल आयुर्वेद काय सांगते त्याविषयी. 

आजकाल मोबाइल फोन्स, काम्प्युटर आणि अनेक इलेक्ट्रानिक उपकरणांना जास्तीत जास्त मेमरी म्हणजेच स्मरणशक्तीची सोय असते. म्हणजेच जास्तीत जास्त माहिती मिळवणे, साठवणे व योग्य वेळी ती पुनश्च वापरात आणणे सहज शक्य होते. आपल्या मस्तिष्काचेही काहीसे असेच आहे आणि मस्तिष्क हे मानवी शरीराचे अंग आहे. पंच ज्ञानेंद्रियांनी मिळवलेले ज्ञान मस्तिष्कामार्फत ग्रहण करून साठवले जाते आणि वेळोवेळी वापरले जाते. रोजच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आपल्या मस्तिष्कात स्मरणशक्तीच्या स्वरुपात साठवलेले असते. परंतु जसे कधी कधी उपकरणात काही तांत्रिक बिघाड झाला तर ही उपकरणे दिलेल्या आज्ञा पाळू शकत नाहीत व निश्चित निकाल देऊ शकत नाहीत. तसेच आपल्या मेंदूसोबतही होतेच की आणि आपण त्यालाच विस्मरण असे म्हणतो.

अगदी थोडय़ा लक्षणांनी विस्मरणाची तोंडओळख आपल्याला जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकते. अगदी लहानपणी किंवा शालेय जीवनात अनेकदा परीक्षेच्या भीतीने आयत्या वेळी आपली स्मरणशक्ती आपल्याला नेमका दगा देते. वरवर पाहता विसरण्याची सवय ही नेहमीच थट्टेचा विषय ठरलेली आहे. पण त्याची दखल वैद्यकीय क्षेत्राला आता गंभीरपणे घ्यायला लागत आहे. डिमेन्शिया, अल्झायमरसारख्या व्याधी ज्या कधी काळी दुर्मिळ होत्या त्या आता सर्रास दिसू लागल्या आहेत आणि आपल्या परिवारात, मित्रमंडळींत, नातेसंबंधात या व्याधींचा चंचुप्रवेश झालेला आहे.

मेंदूविषयक या सगळ्या व्याधी इतक्या जास्त प्रमाणात का दिसू लागल्या आहेत? याचे उत्तर आपल्या बदललेल्या जीवनशैलीत, आहार पद्धतीत आणि मानसिक तणावात लपल्याचे दिसून येते. मानवी जीवन जसजसे वैज्ञानिक पातळीवर जास्त प्रगत होऊ लागले तसतसा मानव जास्तीत जास्त विविध उपकरणांवर अवलंबून राहू लागला. आता हेच बघा ना, काही वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ असायचे. पण आता मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करून ठेवण्याची सोय आली आणि हे क्रमांक तोंडपाठ ठेवण्याची सवयच निघून गेली. पाढे पाठ करण्याची गरज कॅल्क्युलेटरने घालवली. तर स्तोत्र पाठ करण्याची गरज विविध दृक् श्राव्य माध्यमातील सोशल मीडिया अॅप्लिकेशन्सनी घालवून टाकली.

डिजिटल मीडियाच्या या जमान्यात तर नको नको त्या गोष्टींमुळे आपली स्मरणशक्ती व्यापून टाकली आहे. एखाद्या अवयवाला सुस्थितीत ठेवायचे असेल तर त्याचा सुयोग्य वापर करणे जरुरीचे असते. जर आपली स्मरणशक्ती छान ठेवायची असेल तर त्याची सुयोग्य निगा राखायला हवी. ‘धी-धृती-स्मृती’ याचा सुयोग्य निरोगी वापर, जडणघडण व निचरा होणे आवश्यक आहे.

आपण खाल्लेल्या अन्नानेच आपल्या शरीरीचे, मनाचे पोषण होत असते. त्यामुळे अन्न हे पोषक व सत्त्वगुणांनी युक्त हवे. शरीरासोबत मनास व मस्तिष्कासही व्यायम द्यायला हवा. त्यासाठी नियमित वाचन, लिखाण, ध्यान-धारणा, त्राटक यासारखी यौगिक कर्मे नियमितपणे करायला हवीत. यासोबत शरीरास, मनास, मस्तिष्कास ताणविरहित आराम द्यायला हवा. त्यासाठी नियमित झोप, नियमित जीवनशैली, व्यसनांपासून दूर राहणे, नातेसंबंध विकसित करणे हे ओघाने आलेच. ब्राम्ही, शंखपुष्पी, जटामांसी, वचा, यष्टीमधु… यासारख्या मेध्य औषधींचा वापर चिकित्सकांच्या सल्ल्याने जरूर करावा.

सरतेशेवटी ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण होती परंतु त्या ‘सलामत सर’ म्हणजेच डोक्यात तल्लख स्मरणशक्ती आणि सुकार्यरत मस्तिष्क असेल तर विजयाची पगडी आपल्याला मिळणार यात काही शंकाच नाही!

z [email protected]

(लेखक आयुर्वेदतज्ञ आहेत)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार