उद्धवजी… तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राजकारणात धुराळा उडवून दिला आहे. या पुस्तकाने एकाहून एक दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट बाहेर येत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राऊत यांनी पत्र परिषदेत आरोपांची पुन्हा राळ उडवून दिली. इतकेच नाही तर त्यांनी अजून काही गौप्यस्फोट केले. त्यावरून नवीन वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांनी पंतप्रधानांविषयीचा एक मोठा दावा केला आहे.
तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय
यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्या पंतप्रधान होण्यामागील एक किस्सा सांगितला. “नेस्को ग्राऊंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरात मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा मीच होतो तिथे. आताचे भाजपचे लोक नव्हते. मोदी, बाळासाहेब आणि संजय राऊत असा फोटो आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव ठाकरेंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंब्याचं पत्र देत असताना मी गंमतीने काढलेला व्हिडिओ आहे. तोही उपलब्ध आहे. आताची पोरंढोरं तेव्हा नव्हती. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आले आहेत. यांना काय माहीत भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते ते. मी गंमतीने उद्धव ठाकरेंना म्हणालो होते, उद्धवजी तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हणाले, हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधी तरी सांगायला पाहिजे मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर” अशी माहिती राऊतांनी आज झालेल्या पत्र परिषदेत दिली.
शाह आल्यापासून सेना-भाजपात दरी
शिवसेना आणि भाजपात सलोख्याचे संबंध होते. पण अमित शाह हे जसे दिल्लीत आले, तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये दरी वाढल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी सुद्धा राऊतांनी युती तुटण्यामागे अमित शाह असल्याचा आरोप केला होता. राऊत सातत्याने शाह यांच्यावर आरोप करत आहे. आताही त्यांनी शाह यांना आपण फोन करून आपल्याला अटक करा असे सांगितल्याची माहिती दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List