‘…म्हणजे विषयच संपला’, पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंचा संताप, केली मोठी मागणी
पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?
त्यांना जिव घेण्याचा अधिकार नाही. असे हल्ले वारंवार घडत आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात हुशार माणूस समजला जातो. परंतू आता प्राणी परवडले असं म्हणण्याची वेळ आली आहे, या घटनेमुळे वेदना होतात, गुन्हेगारी थांबवायची असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना सुट्टी देता कामा नये, अशा लोकांचा खात्मा झालाच पाहिजे, दहशतवादी आणि त्यांचे कॅम्प उडवले पाहिजेत असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
त्यांचा ट्रेनिंग कॅम्पच उद्ध्वस्त करून टाका म्हणजे विषयच संपतो, जागतिक परिषदा होतात, त्यामध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी असतात. त्यामध्ये अनेकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आता यावर तोडगा काढला पाहिजे, हे आणखी किती दिवस चालणार? किती लोकांचे बळी जणार असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केला आहे.
दरम्यान राज्यात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे, यावर देखील उदयनराजे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. वस्तुस्थितीशी गाठ बांधली पाहिजे, जग पुढे चाललं आहे. दररोज वेगाने डेव्हलपमेंट होत आहे. 21 वं शतक आहे. या धावत्या जगात आपल्याला उंचीवर जायचं असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भाषेला महत्त्व आहेच असं त्यांनी म्हटलं आहे.
कॉलेजच्या जीवनातला एक किस्सा सांगतो, फर्ग्युसनला मराठी मिडीयममधली मुले माझ्या बाजूच्या रूममध्ये होते, ती टॉपर होती, त्यांच्याकडे बघून वाईट वाटायचं, डबल अभ्यास करावा लागायचा, खूप जवळून बघितलेलं आहे, मी हे सर्व. पहिल्यांदा इंग्लिशचं ट्रान्सलेशन करायचं आणि मग त्याचा अभ्यास कारायचा, हेच जर त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असतं तर त्यांना आणखी फायदा झाला असता, त्यामुळे प्रत्येक भाषा महत्त्वाची असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List