मुंबईत पावसाला सुरूवात, दादर परिसरात ढगाळ वातावरण, कुठे बरसल्या सरी ?
राज्यात अधिकृतरित्या मान्सूनचे आगमन झाले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यातच आज सकाळपासूनच मुंबईतदेखील पावसाचे आगमन झाले असून पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमधील काही भागांत शनिवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारी मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज आहे.
पहाटेपासून मुंबईत पावसाच्या सरी
काल मुंबईत 34.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. घामाच्या धारा, चिकचिक यामुळे मुंबईकर वैतागले होते. मात्र आज ( शनिवार) पहाटेपासूनच मुंबईत वरूण राजाचे आगमन झाले असून मुंबईमध्ये हलक्या सरींचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, आज सकाळपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात झालेली आहे. दादरमध्येही ढगाळ वातावरण असून संपूर्ण मुंबईत असेच वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी किंवा रात्री काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. याचा तापमानावर फारसा फरक पडणार नाही असे सांगण्यात आले. मात्र पावसाच्या आगमनामुळे उन्हाळा, घाम, चिकचिकीमुळे वैतागलेल्या मुंबईकरांना असह्य उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांत पाऊस अधिक पडतो. पुढील दोन-तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यालर्षी महाराष्ट्र आणि मुंबईत लवकर पाऊस दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक
रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दपर्यत उद्या ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्यानच्या जलद मार्गावर अप आणि डाऊन दिशेकडे ब्लॉक सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यत ब्लॉक असेल. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा विचार असेल तर नीट नियोजन करूनच निघा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List