‘तो जोकर, त्याचे चाहते दोन कवडीचे जोकर..’; विराट कोहलीबद्दल राहुल वैद्यची वादग्रस्त पोस्ट
क्रिकेटर विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील तिचा एक फोटो लाइक झाल्याने चर्चेला उधाण आलं. ही चर्चा इतकी झाली की अखेर विराटला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे अशी चूक झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. यानंतर गायक राहुल वैद्यने अप्रत्यक्षपणे विराटवर निशाणा साधला. आता यात राहुलने मधे पडायचं काय कारण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की.. काही वर्षांपूर्वी विराटने राहुलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं. त्याने असं का केलं हे अद्याप स्पष्ट झालं नसून त्याविषयी राहुललासुद्धा आश्चर्य वाटलं होतं. याच कारणावरून राहुलने आता विराटची फिरकी घेतली आहे. परंतु यामुळे विराटचे चाहते त्याच्यावर चिडले असून अनेकांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमक्या, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर राहुलसुद्धा विराटच्या चाहत्यांवर चांगलाच भडकला आहे. “विराटचे चाहते हे दोन कवडीचे जोकर आहेत”, असं त्याने थेट म्हटलंय.
अवनीत कौरचा फोटो चुकून लाइक झाल्यानंतर विराटने इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमवर त्याचं खापर फोडलं. यानंतर राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं, “मला हे बोलायचंय की आजच्या नंतर कदाचित असं होऊ शकतं की अल्गोरिदम खूप सारे फोटो लाइक करेल, जे मी नाही केले. त्यामुळे ज्या कोणी मुली असतील, त्यांनी कृपया याची प्रसिद्धी करू नये, कारण ही माझी चूक नाही. ही इन्स्टाग्रामची चूक आहे, ठीक आहे?”
इतकंच नव्हे, दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्याने थेट विराटवर निशाणा साधला. “तर मित्रांनो, विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय, हे तुम्हाला माहितच असेल. मला असं वाटतं की तेसुद्धा इन्स्टाग्रामच्या ग्लिचमुळेच झालं असावं. विराट कोहलीने मला ब्लॉक केलं नसेल. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमने त्याला म्हटलं असेल की, एक काम कर.. मी तुझ्याकडून राहुल वैद्यला ब्लॉक करतो. बरोबर ना”, असा उपरोधिक सवाल त्याने केला. राहुलच्या या पोस्टनंतर विराटचे चाहते खूप नाराज झाले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यासा सुरुवात केली. काहींनी त्याच्या कुटुंबीयांवरही टीका केली.
विराटच्या चाहत्यांनी कुटुंबीयांवर निशाणा साधताच राहुलसुद्धा शांत बसला नाही. त्याने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटलंय, ‘विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत आणि आता तुम्ही मला शिवीगाळ करताय. इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझी पत्नी, माझ्या बहिणीबद्दलही अपशब्द वापरत आहात. त्यांचं याच्याशी काहीच घेणंदेणं नाही. त्यामुळे मी बरोबर बोललो होतो. म्हणूनच विराट कोहलची चाहते जोकर्स आहेत. दोन कवडीचे जोकर्स!’ राहुलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List