Raid 2 Review: कॉमन मॅनची पैसा वसूल कहाणी; अजय देवगणवर भारी पडला रितेश देशमुख
‘मैदान’, ‘औरों में कहां दम था’, ‘सिंघम अगेन’, ‘नाम’ आणि ‘आझाद’ यांसारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता अभिनेता अजय देवगणचा ‘रेड 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये पुन्हा एकदा अजयने आयकर विभाग अधिकारी अजय पटनायकची भूमिका साकारली आहे. या सीक्वेलमध्ये त्याचा सामना दादाभाई म्हणजेच अभिनेता रितेश देशमुखशी होणार आहे. मागील काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अजयने ‘रेड 2’च्या निमित्ताने षटकार मारल्याचं म्हटलं जात आहे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा सामना जेव्हा भ्रष्ट राजकारण्याशी होतो, तेव्हा काय घडतं याची कथा या चित्रपटात पहायला मिळते. यामध्ये अजय आणि रितेशसोबतच वाणी कपूरचीही मुख्य भूमिका आहे.
अमय पटनायक या आयकर विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप होतो आणि त्याची बदली भोजला केली जाते. तिथला स्थानिक राजकारणी दादाभाई (रितेश देशमुख) जनतेमध्ये लोकप्रिय असतो. परंतु त्याच्याबाबतीत काहीतरी गडबड असल्याचा संशय अमयला येतो आणि त्याच्या घरी, कार्यालयात तो छापा टाकतो. यानंतर दोघांमध्ये होणारी खडाजंगी या चित्रपटात पहायला मिळते.
पूर्वार्धात या चित्रपटातील कथानकात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पहायला मिळतात. यापुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते. दिग्दर्शक राज कुमार गुप्ता हे ‘नो वन किल्ड जेसिका’सारख्या थ्रिलर चित्रपटासाठी ओळखले जातात. ‘रेड 2’मध्येही त्यांनी तशीच दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संपूर्ण वेळ प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतं. परंतु, या चित्रपटातील खटकणारी एक बाब म्हणजे, 1990 च्या पार्श्वभूमीत घडणाऱ्या ‘रेड 2’च्या कथेत काही गोष्टी अत्यंत सोयीस्कररित्या घडतात. चित्रपटाचा हिरो अमयला सतत लोकांकडून अत्यंत सहजतेने मदत मिळत जाते. त्यामुळे दादाभाई म्हणून रितेशच्या भूमिकेला इथे आपोआप कमी लेखलं जातं.
अजय देवगणने आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत अत्यंत चोख काम केलंय. परंतु ‘रेड’च्या पहिल्या भागात ज्याप्रकारे इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण यांची केमिस्ट्री फुलली, तशी या सीक्वेलमध्ये वाणी कपूर आणि अजय यांच्यात फुलताना दिसत नाही. चित्रपटातील वाणीची भूमिका कमकुवत असून अजयसोबत तिची केमिस्ट्रीही खास नाही. तर दुसरीकडे रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त काम केलंय. शिवाय यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं. अमित त्रिवेदीच्या बॅकग्राऊंड म्युजिकची योग्य साथ या चित्रपटाच्या गतीला मिळते. जवळपास सव्वा दोन तासांचा हा चित्रपट ‘परफेक्ट फॅमिली वॉच’ आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List