खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचा अनुभव आला का? रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला..
अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘रेड 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याने एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरमधील रितेशच्या भूमिकेनं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. याच चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रितेश खऱ्या आयुष्यातील भ्रष्टाचाराबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आपल्या घरातील लहान-सहान गोष्टींमधूनच कसा त्याचा पाया तयार होत जातो, याचं उदाहरण त्याने दिलं.
‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत “खऱ्या आयुष्यात तुला कधी भ्रष्टाचाराचा अनुभव आला का?” असा प्रश्न रितेशला विचारला गेला. त्यावर रितेशने आधी नकारार्थी उत्तर दिलं. याविषयी तो पुढे म्हणतो, “आपण भ्रष्टाचाराचं मूळ पाहिलं तर, बाळा तू परीक्षेत चांगले मार्क मिळवलेस, तर मी तुला बॅट घेऊन देईन. जर तू असं म्हणालास तर मी तुला चार चॉकलेट देईन. जरी आपण ते नाही केलं तरी भ्रष्टाचाराच्या तळाशी गेलो तर इथूनच त्याची सुरुवात होते. हळूहळू ते समाजात अशाच पद्धतीने रुजत जातं. कुठे कमिशनपासून सुरुवात होते, तर कुठे ‘यार माझ्यासाठी तू हे काम केलंस, चल मी तुला जेवायला घेऊन जातो’ याची सुरुवात होते. मी या गोष्टींना थेट भ्रष्टाचार असा टॅग देत नाही. पण तुम्ही माझ्यासाठी काही करत असाल तर मी तुमच्यासाठी काहीतरी करेन, याच देवाण-घेवाणीला आपण मोठ्या पातळीवर घेऊन गेलो तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर पसरतो. अनेकदा या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत.”
‘रेड 2’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा अमय पटनाईकच्या भूमिकेत आहेत. तर रितेशने यामध्ये दादाभाईची भूमिका साकारली आहे. या दोघांसोबतच यामध्ये अभिनेत्री वाणी कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘रेड 2’ या चित्रपटाची कथा अमय पटनायक या प्रामाणिक आयकर अधिकाऱ्याभोवती फिरते. ज्याच्या घरावर तो छापा टाकतो, त्याच्याकडून लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर असतो. तर दादाभाई (रितेश देशमुख) हा एक स्थानिक राजकारणी जनतेमध्ये लोकप्रिय असतो. परंतु अमयला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं आणि तो त्याच्या घरावर, कार्यालयात छापे टाकतो. यानंतर दोघं एकमेकांसमोर कसे येतात, याची कथा चित्रपटात पहायला मिळते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List