Kesari 2 : ओपनिंग वीकेंडला ‘केसरी 2’ची छप्परफाड कमाई; 11 चित्रपटांना चारली धूळ
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारसाठी 2025 हे वर्ष खूप खास ठरतंय. कारण या वर्षांत आतापर्यंत त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. जानेवारी महिन्यात त्याच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘केसरी चाप्टर 2’ हा त्याचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटालाही थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ‘केसरी 2’ची चांगलीच कमाई सुरू आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर सकारात्मक रिव्ह्यू देत आणखी प्रेक्षकांना थिएटरकडे खेचलं. त्याचाच चांगला परिणाम बॉक्स ऑफिस गल्ल्यावर दिसून येत आहे.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘केसरी 2’ने पहिल्या दिवशी 7.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवसाच्या कमाईच 25.81 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 12.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं समजतंय. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास 29.75 कोटी रुपये कमावले आहेत. ओपनिंग वीकेंडच्या कमाईच्या बाबतीत ‘केसरी 2’ने 2025 या वर्षातील फक्त चार चित्रपट सोडून इतर सर्वांना मात दिली आहे. या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा चित्रपट ठरला आहे.
‘केसरी 2’ने ओपनिंग वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत 11 चित्रपटांना दिली मात
गेम चेंजर- 26.59 कोटी रुपये
देवा- 19.43 कोटी रुपये
द डिप्लोमॅट- 13.45 कोटी रुपये
इमर्जन्सी- 12.26 कोटी रुपये
फतेह- 10.71 कोटी रुपये
बॅडअॅस रवी कुमार- 9.72 कोटी रुपये
मेरे हसबंड की बीवी-5.28 कोटी रुपये
लवयापा- 4.75 कोटी रुपये
आझाद- 4.75 कोटी रुपये
क्रेझी- 4.25 कोटी रुपये
सुपर बॉइज ऑफ मालेगांव- 1.82 कोटी रुपये
‘केसरी चाप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागीने केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने, लिओ मिडीया कलेक्टिव्ह आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडबद्दल आजवर कधीच समोर न आलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमारने दिग्गज वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. अक्षयच्या 2019 मधील ‘केसरी’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शुक द एम्पायर’ या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. 18 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List