महाबळेश्वर-पाचगणी रस्ता गेला ‘खड्ड्यांत‘
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तर, दिवाळी सुट्टीच्या पर्यटनाच्या ऐन हंगामात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने, या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
सातारा जिह्यात चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री, तरीही महाबळेश्वर-पाचगणीच्या रस्त्याची मोठी दुर्दशा झालेली आहे. महाबळेश्वर बांधकाम विभाग कार्यालयापासून वेण्णा लेकमार्गे पसरणी घाट, पाचगणी रोडवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हेच ओळखता येत नाही. जिथे डांबर टाकलं ते पावसाळ्यात वाहून गेले आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. या रस्त्यांवर डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र, तिचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List