त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता? इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा : उद्धव ठाकरे
मतदार याद्यांमधील घोळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरले. एकाच घरात 200-400 लोक राहत असल्याचे यादीत दिसते, सत्ताधाऱयांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून टाकलाय, मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणुका निष्पक्ष घ्यायच्या असतील तरच घ्या; नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, असेही त्यांनी ठणकावले.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. चोक्कलिंगम म्हणतात, जबाबदारी आमच्याकडे नाही. राज्य निवडणूक आयोग म्हणतो, आमच्याकडे नाही. मग आम्ही बोलायचे कुणाशी, असा संताप त्यांनी भरबैठकीत व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे आयोगावर बरसले.
उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सर्वपक्षीय शिष्टमंडळात निमंत्रण देऊनही सहभागी न झालेल्या सत्ताधाऱयांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. भाजपलाही बोलवले होते, पण ते आलेच नाहीत. आयोग भाजपच्या दबावाखाली काम करतोय का? मतदार याद्यांमध्ये भाजपची ढवळाढवळ नसेल तर त्यांनी शिष्टमंडळात यायला हवे होते. आता हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. भाजपचे कार्यकर्ते मतदार याद्यांबरोबर खेळताहेत, असे निदर्शनास आणून दिले होते. वाट्टेल त्याला यादीत घुसवत आहेत आणि यादीतून वगळत आहेत. तरीही आयोगाने काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केले नाही का? मग सर्व खुसपटं आत्ताच का काढली जात आहेत? हा सरळसरळ खोटा कारभार आहे. व्यवस्थित निवडणूक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. राजकीय पक्षांकडून चूक झाली तर ‘करप्ट प्रॅक्टिस’ म्हणून त्यांना कायद्याचा दंडुका उगारला जातो, मग आम्ही म्हणतो, ही निवडणूक आयोगाची ‘करप्ट प्रॅक्टिस’ आहे. हा त्यांचा भ्रष्टाचार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्कही निवडणूक आयोगाने हिरावला होता. मग आता निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
हुकूमशाही कदापि मान्य करणार नाही
ईव्हीएमवर शिवसेनेचा आक्षेप आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवर होणार आहेत; पण व्हीव्हीपॅट राहणार नाही, व्हिडीओ रेकार्ंडग देणार नाही, असे आयोगाने सांगितले. ही हुकूमशाही शिवसेना कदापि मान्य करणार नाही. व्हीव्हीपॅट घेत नाही म्हणजे तुम्ही सर्व पुरावे नष्ट कराल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना बैठकीत सांगितले. उद्धव ठाकरे यांचा आवेश पाहून यावेळी आयुक्तही निरुत्तर झाले.
मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे? राज ठाकरे
मतदार यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे, असा सवाल करत राज ठाकरे यांनी अशी यादीच यावेळी झळकवली.
- 2024 नंतर मतदार यादी जाहीर केली त्यात अनेकांची नावे आहेत, पण फोटो नाहीत. मुख्य निवडणूक अधिकारी आणि आयुक्त, दोघेही म्हणतात, ते आमच्या अखत्यारीत येत नाही. मतदार याद्या न दाखवून यांना काय मिळणार आहे?
- जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या नुकत्याच आल्या. 2022 च्या याद्या मतदारांच्या नाव आणि फोटोसह आहेत. 2025 च्या याद्यांमधून मतदारांचे फोटोच काढून टाकलेत. पारदर्शकता म्हणता तर हा घोळ का घालताय? याआधी अनेक निवडणुका झाल्या. हल्लीच का हे घोळ व्हायला लागले.
- मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. तशाही पाच वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. आणखी सहा महिने नाही झाल्या तर काय फरक पडतो? पारदर्शकता येणार नाही, राजकीय पक्षांचे याद्यांबाबत समाधान होणार नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नका. मतदार यादीत घोळ असेल तर तयारी नाही असे न्यायालयाला सांगा, निवडणूक पुढे ढकला.
- काल निवडणूक आयोगाने आठ दिवसांची मुदत दिली आहे ती रद्द करा. उद्या-परवामध्ये आयोग काय निर्णय घेतो ते पाहू, नंतर आम्ही आमचा निर्णय सांगू.
मी यापूर्वीही महाविकास आघाडीबरोबर होतो!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, असा प्रश्न यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर, मी यापूर्वीही महाविकास आघाडीबरोबर दिसलो होतो, असे राज ठाकरे म्हणाले. 2017 मध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतदार याद्यांच्या घोळावरून मी प्रश्न उपस्थित केले होते याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. त्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारही आमच्याबरोबर होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते, मुद्दे मांडत होते. आजही त्यांनी आमच्याबरोबर यायला हवे होते, अशी कोटीही राज ठाकरे यांनी केली. निवडणूक कोणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही, तर निवडणुका कशा होणार हे महत्त्वाचे आहे, असे ते पुढे म्हणाले.
मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त मतदार यादीची बाब एकमेकांवर ढकलताहेत. मग यांचा बाप नेमका कोण? ते आयुक्त आहेत की कठपुतळे आहेत? वरून दोर हलवले की हलतात!
आयोगावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का?
सर्व प्राण्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टाने घेतल्या, तशीच मतदार यादीतील घोळाची ही मनुष्यप्राण्यांची केसही घ्यायला हवी. सत्ताधाऱयांच्या मतचोरीच्या, पक्षचोरीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या आहेत. 117 आणि 124 वर्षे इतकी लंबी उमर असलेले मतदार हिंदुस्थानच्या मतदार यादीत आहेत. म्हणजे जगात सर्वात चांगले हवामान हिंदुस्थानात आहे, दीर्घायुषी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने हे स्वीकारले पाहिजे आणि आयोगाचा पुनर्जन्मावर विश्वास असला पाहिजे. नाहीतर हे मतदार हयात आहेत, पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतलाय म्हणून आयोगावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List