अमेरिकेत हिंदुस्थानी अभियंत्याला पोलिसांनी गोळ्या घालून मारले, वाचा नेमकं काय घडलं?
सध्याच्या घडीला अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे जगाच्या केंद्रस्थानी अमेरिका आहे. नुकतेच अमेरिकेमध्ये पोलिसांनी हिंदुस्थानी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या झाडून हत्या केली. मूळचा तेलंगणातील असलेल्या या अभियंता तरूणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद निजामुद्दीन याने रूममेटशी वाद घातला होता असा आरोप आहे. तेलंगणाच्या निजामुद्दीनच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह परत मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. त्याला गोळी मारण्यापूर्वी, निजामुद्दीनने वांशिक छळ आणि नोकरीतील अडचणींबद्दल सार्वजनिकरित्या तक्रार केली होती.
मोहम्मद निजामुद्दीनने फ्लोरिडा येथून संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर तो कॅलिफोर्नियातील एका कंपनीत काम करत होता. परंतु नंतर त्याला काढून टाकण्यात आले. लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये निजामुद्दीनने आरोप केला की, त्याला वाईट वागणूक देऊन कामावरून काढून टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या पगाराच्या बाबतीतही फसवणूक करण्यात आली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, निजामुद्दीनवर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सांता क्लारा पोलिसांच्या निवेदनानुसार, चाकू हल्ल्याबाबत 911 वर कॉल आला. माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, ते पोहोचले तेव्हा त्यांना एक माणूस चाकू घेऊन उभा असलेला आढळला. त्याने आज्ञा पाळण्यास नकार दिला तेव्हा त्याला गोळी मारण्यात आली. निवेदनात असेही म्हटले आहे की, त्या माणसाचा रूममेट खाली पडलेला होता आणि अनेक ठिकाणी जखमी होता. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती निजामुद्दीनचे वडील हसनुद्दीन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलिसांनी हा गोळीबार केला होता. सध्याच्या घडीला निजामुद्दीनचा मृतदेह स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. हा मृतदेह आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कुटुंबियांनी तेलंगणा सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List