भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदरी निराशा, निरजला आठव्या तर सचिनला चौथ्या क्रमांकावर मानावे लागले समाधान
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदरी निराशा आली आहे. भालाफेकीच्या अंतिम राऊंडमध्ये हिंदुस्थानच्या नीरज चोप्रा याला आठव्या तर सचिन यादवला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 25 वर्षीय सचिनचे पदक तर अवघ्या 40 सेंटीमीटरने हुकल्याने देशवासियांनी हळहळ व्यक्त केली. मात्र निरजनंतर आता सचिन यादव हा भालाफेकीतला उभरता तारा ठरला आहे.
अंतिम फेरीत हिंदुस्थानची सर्व आशा ज्याच्यावर होती तो निरज चोप्रा अंतिम सहामध्ये देखील पोहचू शकला नाही. तर ज्या सचिन यादवची कुठेही चर्चा नव्हती त्याने अंतिम फेरी तर गाठली सोबत चौथ्या स्थानापर्यंत मजलही गाठली. सचिनने पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटर लांब भाला फेकला. मात्र तो सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नानंतर चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याचं कांस्यपदक फक्त 40 सेंटीमीटरने हुकले.
सचिन यादव हा मूळचा उत्तर प्रदेशमधील खेकरा गावचा आहे. सचिन १९ व्या वर्षी अॅथलॅटिक्समध्ये आला. नवी दिल्लीत त्याने भालाफेकीचे प्रशिक्षण घेतले. मात्र २०२३ मध्ये तो उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर तो भालाफेक खेळणे सोडणार होता. मात्र त्याच्या शेजारी राहणाऱ्या संदीप यादवने त्याला भाला फेक प्रशिक्षक नवल सिंह यांच्याकडे प्रशिक्षणासाठी जाण्याचा सल्ला दिला. तिथे दोन वर्ष अथक मेहनत केली. सचिनने गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने आशियाई चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List