मतचोरीचे 100 टक्के बुलेटप्रूफ पुरावे! राहुल गांधी यांचे क्षेपणास्त्र… पाऊण तासात आयोगाच्या चिंधडय़ा
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर संघटित मतचोरीचा बॉम्ब टाकणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज क्षेपणास्त्रच डागले. कर्नाटकच्या आलंद विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदार पद्धतशीरपणे कसे वगळले गेले आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात हजारो मतदार कसे घुसवले गेले याचे पुरावेच त्यांनी देशासमोर ठेवले. हे पुरावे शंभर टक्के बुलेटप्रूफ असल्याचा दावा त्यांनी केला. ज्यांच्या नावांचा वापर करून हे घोटाळे झाले, त्यांनाच मीडियासमोर आणत पाऊण तासांच्या स्फोटक पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आयोगाच्या कारभाराच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘एकाच जागी बसून वेगवेगळ्या ठिकाणच्या मतांवर डल्ला मारणारे नेमके कोण आहेत हे आयोगाला नीट माहीत आहे. पण ज्ञानेश कुमार हे लोकशाही उद्ध्वस्त करणाऱया या मतचोरांचे संरक्षण करत आहेत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
देशात मतचोरी करून निवडणुका जिंकल्या जात असल्याचा व त्यात सरकार व आयोगाची मिलिभगत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. त्याचे पुरावेही दिले होते. त्यानंतर आज त्यांनी आणखी मोठा घोटाळा पुराव्यांसह समोर आणला. कर्नाटकातील आलंद मतदारसंघात बूथ पातळीवरील अधिकाऱयाच्या काकांचे नाव मतदारयादीतून वगळण्यात आले होते. त्याविषयी माहिती घेतली असता त्यांच्या शेजाऱयानेच त्यासाठी अर्ज केल्याचे आढळून आले. त्याच्याकडे विचारणा केली असता शेजाऱयाने कानावर हात ठेवले. मला याची काहीच कल्पना नसल्याचे तो म्हणाला. त्यामुळे यामागे एक वेगळीच शक्ती असल्याचा संशय बळावला. या शक्तीने संपूर्ण प्रक्रियाच हायजॅक करून मतदारांची नावे वगळली होती. योगायोगाने बूथ पातळीवरील अधिकाऱयासोबतच हा प्रकार घडल्याने चोरी पकडली गेली, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ज्यांची नावे वगळली गेली, ज्यांनी त्यासाठी अर्ज केले आणि ज्यांच्या नावाने अर्ज केले, त्यांनाही राहुल गांधी यांनी मीडियासमोर आणले. ही केवळ सुरुवात आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हे सगळे सुरू आहे. हिंदुस्थानची लोकशाही हायजॅक केली गेली आहे. देशाची जनताच तिचे रक्षण करू शकते, असे राहुल म्हणाले.
आलंदमध्ये वगळले!
कर्नाटकातील आलंद मतदारसंघातील 6,018 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली. ज्या लोकांच्या नावाने त्यासाठी अर्ज केले गेले, त्यांनाही याची माहिती नव्हती. त्यासाठी राज्याबाहेरच्या मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला. वगळलेले मतदार हे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बूथवरील होते.
राजुरामध्ये वाढवले!
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6850 मते वाढवण्यात आली. त्यासाठीही राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक वापरण्यात आले. नावे समाविष्ट करण्यासाठी ज्यांच्या नावाने अर्ज आले होते, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. आलंदमध्ये मतचोरी करणाऱया यंत्रणेनेच हे केले असावे.
आयोगाला 18 महिन्यांत 18 पत्रे
आलंद मतचोरी प्रकरणात फेब्रुवारी 2023 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात सीआयडीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागितली. ऑगस्ट महिन्यात निवडणूक आयोगाने अर्धी-मुर्धी माहिती दिली. मात्र तेवढय़ाशा माहितीच्या आधारे चौकशी करता येणार नव्हती. त्यामुळे सीआयडीने आयोगाला 18 स्मरणपत्रे पाठवली. शेवटचे पत्र सप्टेंबर महिन्यात पाठवले गेले. मात्र त्याचे कुठलेही उत्तर आले नाही. ज्ञानेश कुमार हे मतचोरांचे संरक्षण करत आहेत याचा हा पुरावा आहे, असे राहुल म्हणाले.
सूर्यकांत, बबिता चौधरी स्टेजवर
राहुल गांधी यांनी सूर्यकांत आणि बबिता चौधरी या दोघांना स्टेजवर आणले. सूर्यकांत यांचे नाव मतदार वगळण्यासाठी वापरण्यात आले होते. त्यांनी 14 मिनिटांत 12 नावे डिलिट केली. पण त्यांना यातले काहीच माहीत नव्हते. बबिता चौधरी यांचे नाव डिलिट करण्यात आले होते. त्यांनी कधीच त्यासाठी अर्ज केला नव्हता. नागराज नावाच्या व्यक्तीने सकाळी चार वाजता उठून दोन मतदारांची नावे वगळण्यासाठी दोन अर्ज केले. अवघ्या 36 सेकंदात त्यांनी हे सगळे केले आणि पुन्हा झोपले. हे कसे शक्य आहे, असा प्रश्न राहुल यांनी केला.
आयोगाला 7 दिवसांचा अल्टिमेटम
ज्ञानेश कुमार यांनी आयुक्तांच्या खुर्चीवर बसताना पारदर्शकता व निष्पक्षतेची शपथ घेतली आहे. त्यांनी आपले कर्तव्य करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आलंदमध्ये कोणत्या मतदारांची नावे वगळली, ती का वगळली आणि त्यासाठी कोणी अर्ज केले होते याची सविस्तर माहिती मोबाईल क्रमांक आणि ओटीपीसह निवडणूक आयोगाने 7 दिवसांत द्यावी, असा अल्टिमेटम राहुल यांनी दिला. आयोगाने ही माहिती न दिल्यास मतचोरीमध्ये निवडणूक आयुक्तांचा सक्रिय सहभाग आहे हे सिद्ध होईल, असे राहुल यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप निवडणूक आयोगाने लगेचच फेटाळून लावले. ‘हे आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. मतदारांची नावे ऑनलाइन वगळण्याची पद्धतच नाही. नाव डिलिट करायचे असल्यास संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय ते केले जात नाही, असे आयोगाने सांगितले. मात्र, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची उत्तरे देणे आयोगाने टाळले. आलंद मतदारसंघातील नावे वगळली गेली का आणि राजुरामध्ये वाढवली गेली का, यावर आयोगाने काहीच भाष्य केले नाही.
हायड्रोजन बॉम्ब येतोय!
मतचोरीचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडण्याचा शब्द राहुल यांनी बिहारच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान दिला होता. आज त्याचाच स्फोट होईल असे वाटले होते. मात्र, आजचा गौप्यस्फोट हा हायड्रोजन बॉम्ब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘हायड्रोजन बॉम्ब येतो आहे. आमच्या पक्षाचे लोक त्यावर काम करत आहेत. मतचोरी खणून काढत आहोत. त्यासाठी दोन-तीन महिने लागतील. लवकरच हायड्रोजन बॉम्ब टाकू,’ असा इशारा राहुल यांनी दिला.
आयोगातील ‘सूत्रां’ची कुमक
‘आयोगातील काही लोकच आम्हाला मदत करत आहेत. त्यांच्याकडूनच मतचोरीची माहिती मिळत आहे,’ असा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला. ‘हे आता थांबणार नाही. देशातील तरुणांना जेव्हा मतचोरी होत असल्याचे कळेल तेव्हा त्यांची ताकदही आम्हाला मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारांची नावं पाहा! YUH, UQJJW
महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आलेल्या बनावट मतदारांची विचित्र नावे आणि पत्तेही राहुल यांनी दाखवले. त्यात एका मतदाराचे नाव YUH, UQJJW आणि पत्ता Sasti, Sasti असा होता. हाच पॅटर्न कर्नाटक, बिहार, हरयाणा व उत्तर प्रदेशातही आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअर
एका विशिष्ट ठिकाणी बसून सेंट्रलाइज्ड सॉफ्टवेअरच्या मदतीने मतदार वगळण्याचे आणि जोडण्याचे हे ऑपरेशन करण्यात आले आहे. कॉल सेंटरचा वापर त्यासाठी झाला असावा. एकाच मोबाईल क्रमांकावरून वेगवेगळ्या राज्यांत अर्ज केले गेले. मतदार वगळणे व जोडणे या दोन्ही गोष्टींसाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली असावी, असे राहुल म्हणाले.
मी विरोधी पक्षाचा नेता आहे. 100 टक्के पुरावा असल्याशिवाय मी बोलणार नाही. माझं देशावर, संविधानावर, लोकशाहीवर प्रेम आहे. त्याचं संरक्षण करण्याचा माझा प्रयत्न आहे.
निवडणूक आयोगाला माहीत आहे हे सगळं कोण करतंय. देशातल्या प्रत्येकाला हे माहीत व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण हा तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे. माहिती लपवून आयोग लोकशाहीच्या खुन्यांचं रक्षण करतोय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List