म्हाडाच्या 149 दुकानांसाठी आतापर्यंत 700 अर्ज
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 149 दुकानांचा ई लिलाव करण्यात येणार असून या दुकानांसाठी आतापर्यंत 700 अर्ज प्राप्त झाले आहेत. 10 सप्टेंबरला ई लिलाव होणार असून 11 सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 149 दुकानांच्या विक्रीतून 125 ते 150 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी म्हाडाला आशा आहे.
दुकानांच्या ई लिलावात मुलुंड गव्हाणपाडातील 6, कुर्ला- स्वदेशी मिलमधील 5, तुंगा पवईतील 2, कोपरी पवईतील 23, चारकोपमधील 23, जुने मागाठाणे येथील 6, महावीर नगर कांदिवलीमधील 6, प्रतीक्षा नगर येथील 09, अँटॉप हिल येथील 3, मालवणी येथील 46, गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील 17 तसेच शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर आणि जोगेश्वरी मजासवाडीतील प्रत्येकी एका दुकान विक्रीसाठी उपलब्ध आहे. ई-लिलावाकरिता https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी, ऑनलाईन अर्ज आणि अनामत रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी 8 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत आहे.
गेल्या लिलावात विक्री न झालेल्या गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील दुकानाचा देखील यंदाच्या लॉटरीत समावेश आहे. बॅंक किंवा एटीएमसाठी आरक्षित असलेल्या या दुकानाची बेस प्राईज गेल्या लिलावात 13 कोटी 93 लाख रुपये होती. यंदाच्या लिलावात या दुकानाची बेस प्राईज कमी करून 12 कोटी 63 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी या दुकानाची विक्री होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List