राजधानी दिल्लीला पुराचा तडाखा, यमुना नदी खवळली; हजारो संसार वाहून गेले, जनजीवन विस्कळीत
पंजाब, हिमाचल प्रदेशनंतर आता दिल्लीतही प्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे. एनसीआर परिसरात सतत सुरू असलेला पाऊस तसेच हरियाणातील हाथिनीकुंड आणि अन्य बंधाऱ्यातून सोडणाऱ्या येणाऱ्या पाण्यामुळे यमुना नदी ओसंडून वाहत आहे. दिल्लीला याचा मोठा फटका बसला असून अनेक भागात जलप्रलय आला आहे. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसले असल्याने अनेक संसार पाण्यात वाहून गेले आहेत.
यमुना खादर परिसरासोबतच दिल्लीतील अनेक भागात पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूरग्रस्तांची मदत शिबिरांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यमुना बाजार, मठ बाजार, निगम बोध घाट, नील छत्री वाला मंदिर, उस्मानपूर गाव आणि सिव्हिल लाईनच्या काही भागात यमुनेचे पाणी भरले आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता यमुनेची पाण्याची पातळी 207.45 मीटर नोंदली गेली.
पूरग्रस्तांना राहण्यासाठी 25 हून अधिक भागात मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. गीता कॉलनी उड्डाणपुलावर देखील तात्पुरती मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. पुरामुळे अक्षरधाम उड्डाणपुलाखालील सर्व्हिस लेनवर मोठी भेग पडली आहे.
एनडीआरएफच्या बोटीद्वारे बचावकार्य सुरू
यमुना बाजारात एनडीआरएफकडून बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एनडीआरएफने 1100 हून अधिक लोकांना वाचवले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने पूर्व दिल्लीतील यमुना बँक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List