8 महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम, 27 वर्षांच्या फलंदाजाची निवृत्ती चर्चेत
क्रिकेट विश्वातील एक ताकदवर संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु मागील 8 महिन्यांमध्ये संघाला एका मागे एक चांगलेच धक्के बसले आहेत. मागील 8 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पाच खेळाडूंनी टी-20 आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
वेगावर स्वार होणारा ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन दिवसांपूर्वी (2 सप्टेंबर 2025) टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीमध्ये 65 सामने खेळले असून 7.74 च्या सरासरीने 79 विकेट घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना अस्मान दाखवणाऱ्या ग्लॅन मॅक्सवेलनेही 2 जून 2025 रोजी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. 2026 साली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी त्याने हा निर्णय घेतला. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीमुळे. चॅम्पियन्स ट्रॉफीत झालेल्या संघाच्या पराभवानंतर त्याने 5 मार्च 2025 रोजी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या तीन दमदार खेळाडूंव्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिस (6 फेब्रुवारी 2025) आणि 27 वर्षीय व्हिल पुकोवस्की (8 एप्रिल 2025) याने निवृत्तीची घोषणा केली. या सर्व खेळाडूंमध्ये व्हिल पुकोवस्कीची निवृत्तीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या व्हिलला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इच्छा नसतानाही निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. त्याने एक कसोटी सामना खेळला असून 72 धावा केल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List