साई संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
श्री साईबाबा संस्थानला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला असून, त्यामुळे शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
[email protected] या मेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये, साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेलमध्ये ‘भाविक आणि कर्मचाऱयांना तत्काळ मंदिरातून बाहेर काढा’, असा इशारादेखील देण्यात आला आहे. मेलमध्ये ‘भगवंत मान’ हे नाव वापरण्यात आले आहे. हे नाव खरे आहे की बनावट, याचा तपास शिर्डी पोलिसांनी सुरू केला आहे.
साई संस्थानकडून ही बाब गांभीर्याने घेत तत्काळ शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलीस प्रशासन आणि साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून, मंदिर परिसरात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीही धमकीचा मेल साई संस्थानला प्राप्त झाला होता. त्यामुळे ही पुन्हा एकदा मिळालेली धमकी खोडसाळपणाची आहे की, गंभीर कटाचा भाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
श्री साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱयाविरोधात फिर्याद
श्री साईबाबांची बदनामी करणाऱया एका बाबाविरोधात साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी गाडीलकर यांच्या निदर्शनास आणून दिली. श्री साईबाबांच्या बदनामीचा विषय गंभीरपणे घेत स्वतःच फिर्याद दाखल केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List