पॅलेस्टाईनवरील फ्रान्सच्या घोषणेमुळे अमेरिकेचा संताप, इस्रायलचा आक्षेप, सौदी अरेबियाला आनंद; नेमकं काय घडलं?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. मॅक्रॉन यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसामान्य सभेत फ्रान्स हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करेल. या घोषणेमुळे मध्यपूर्वेतील राजकीय वातावरण तापले असून, इस्रायल आणि अमेरिकेने यावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे, तर सौदी अरेबिया आणि पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी याचे स्वागत केले आहे.
मॅक्रॉन यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फ्रान्स मध्यपूर्वेत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे. पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देणे हा आमच्या दीर्घकालीन शांतता धोरणाचा भाग आहे, असे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. फ्रान्स हा प्रमुख पाश्चिमात्य देशांपैकी पहिला देश ठरेल, ज्याने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यापूर्वी स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंड यांनी 2024 मध्ये पॅलेस्टाईनला मान्यता दिली होती.
इस्रायल आणि अमेरिकेचा आक्षेप
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मॅक्रॉन यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, “हा निर्णय दहशतवादाला बक्षीस देणारा आहे आणि यामुळे पॅलेस्टाईन इराणच्या प्रभावाखाली आणखी एक दहशतवादी केंद्र बनू शकते.” तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही या निर्णयाला बेजबाबदार ठरवत, 7 ऑक्टोबर 2023 च्या हमासच्या हल्ल्यातील बळींचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List