चांगला स्वयंपाक बनवत नाही म्हणून टोमणा मारणे छळ नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय
विवाहित महिलांच्या छळवणुकीसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला तिच्या काळ्या रंगावरुन तसेच स्वयंपाक नीट करीत नाही म्हणून टोमणे मारणे याला छळ म्हणता येत नाही, असे निरिक्षण न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. पत्नीला स्वयंपाक आणि काळ्या रंगावरुन टोमणे मारल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातील पतीला सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र त्याच्यावरील आरोप भारतीय दंड संहितेच्या कलम 498-अ (छळवणूक) आणि कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आणि आरोपी पती सदाशिव रुपनावारची निर्दोष मुक्तता केली.
सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या प्रेमा रुपनावार या महिलेने जानेवारी 1998 मध्ये विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार, तिला पती वारंवार काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा तसेच चांगले जेवण बनवत येत नसल्याच्या कारणावरुन वाद घालायचा. त्याच आरोपावरुन सातारा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
पतीच्या अपिलावर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने निर्णय दिला आहे. मृत महिलेने तिला पती आणि सासरे त्रास देत असल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. तिचा काळा रंग आणि व्यवस्थित स्वयंपाक न करणे यावरुन वारंवार टोमणे मारत होते. मात्र अशाप्रकारचे वाद हे वैवाहिक जीवनातून उद्भवणारी भांडणे आहेत. याला घरगुती कलह म्हणता येईल. एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याइतपत याला गंभीर म्हणता येणार नाही, असे न्यायमूर्ती मोडक यांनी नमूद केले आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List