महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन मिळाव्यात म्हणून मल्टिप्लेक्समधून थेट मराठी चित्रपट उतरवले जाण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा 3’ या मराठी चित्रपटाला याचा फटका बसला.
अनेक चित्रपटगृहांमधून ‘येरे येरे पैसा 3’ काढून त्याजागी ‘सैयारा’ या हिंदी चित्रपटाला स्थान देण्यात आले आहे. याविरोधात चित्रपटाचे निर्माता आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या राज्यात आम्ही स्क्रीनसाठी भीक मागायची आणि बाहेरच्या लोकांना आमच्या स्क्रीन काढून द्यायचा प्रकार संतापजनक आहे. याला आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.
मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल
हिंदीसाठी मराठी चित्रपटाची स्क्रीन उतरवल्याबद्दल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत आहेत. तरीही प्रश्न काही संपत नाहीत. ‘सैयारा’या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून ‘ये रे ये रे पैसा 3’ या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले. हे नेहमीचेचे झाले आहे. मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल. मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
‘ये रे ये रे पैसा 3’ चे शो रद्द
18 जुलै रोजी ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. संजय जाधव दिग्दर्शित हा चित्रपट 306 सिनेमागृहांमध्ये 768 स्क्रीनवर झकळला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यानंतर ‘सैयारा’साठी मराठी चित्रपट स्क्रीनवरून उतरवण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List