अवघ्या महाराष्ट्रात पावसाचे उधाण, मुंबईसह उपनगराला झोडपून काढले! कोकणात नद्यांना पूर आला… विदर्भात गावांचा संपर्क तुटला
अवघ्या महाराष्ट्रात पावसाचे उधाण आले असून आज मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे दाणादाण उडाली. मध्य रेल्वे आणि हार्बरवरील वाहतूक 10 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. तर पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनचालकांची रखडपट्टी झाल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारांना लेटमार्क लागला. कोकणातील अनेक नद्यांना पूर आला असून पावसामुळे विदर्भातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मराठवाडय़ातही पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू असून उत्तर महाराष्ट्रालाही खबरदारीचा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने मुंबईला दिलेल्या ऑरेंज अलर्टचा अंदाज खरा ठरवत गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरूच होता. शहरापेक्षा दोन्ही उपनगरामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता. विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोलीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे आज भंडारा जिह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
z गडचिरोलीला रेड अलर्ट देण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने तब्बल 100 गावांशी संपर्क तुटला आहे.
काळजी घ्या, सोसाटय़ाचे वारे वाहणार
g मुंबईत उद्या मुसळधार पावसासह 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काळजी घ्या, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले.
g समुद्रालाही अजून दोन दिवस उधाण राहणार असल्याने 4 ते 5 मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्याने चौपाटय़ांवर जाणे टाळा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List