Air India विमान दुर्घटनेनंतर DGCA सतर्क, सर्व बोइंग विमानांमध्ये ‘फ्युएल स्विच लॉक’ तपासणी केली बंधनकारक
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमानन महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वपूर्ण सुरक्षा आदेश जारी केला आहे. सर्व हिंदुस्थानी नोंदणीकृत बोईंग विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग यंत्रणेची तपासणी 21 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. या आदेशानुसार, सर्व एअरलाइन्सना फ्युएल स्विच सिस्टीमच्या तपासणीचा अहवाल नियामक कार्यालय आणि संबंधित प्रादेशिक कार्यालयांना सादर करावा लागणार आहे.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडिया फ्लाइट AI171, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले होते. या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह जमिनीवरील 19 जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. ही गेल्या दशकातील जागतिक स्तरावरील सर्वात घातक विमान दुर्घटना आणि हिंदुस्थानातील 30 वर्षांतील सर्वात मोठी विमान दुर्घटना ठरली आहे.
विमान दुर्घटना तपास ब्युरोच्या (AAIB) प्रारंभिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा बंद झाला होता. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर एका पायलटने दुसऱ्या पायलटला “तू इंधन का बंद केले?” असा प्रश्न विचारल्याचे आणि दुसऱ्या पायलटने “मी तसे केले नाही” असे उत्तर दिल्याचे रेकॉर्ड झाले आहे. या अहवालानुसार, फ्युएल कंट्रोल स्विचेस रन वरून कटऑफ स्थितीत गेल्याने इंजिनांना इंधन पुरवठा थांबला आणि विमान कोसळले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List