दिवसभरात सात विमान उड्डाणे रद्द! एअर इंडियाचे दिवस फिरलेत
एअर इंडियाचे दिवस फिरले असून प्रवासी सुरक्षा हवेतच हेलकावे खात आहेत. भीषण विमान दुर्घटना घडलेल्या अहमदाबाद-लंडन मार्गावर मंगळवारी दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे पहिले विमान उड्डाण करणार होते; मात्र त्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला आणि ते उड्डाण आयत्यावेळी रद्द करावे लागले. एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. त्यामुळे विविध विमानतळांवर शेकडो प्रवाशांना बिघाडाच्या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ड्रीमलायनरला भीषण अपघात झाला आणि त्यात विमान प्रवासी व नागरिकांसह 270 जणांचा बळी गेला. त्या घटनेमुळे एअर इंडियाचे ड्रीमलायनर सुरक्षित नसल्याचे उघड झाले. त्यानंतर सरकारने ड्रीमलायनर सुरक्षेबाबत ठोस पाऊल उचलणे अपेक्षित असताना अजूनही प्रवासी सुरक्षा हवेत हेलकावे खात आहेत. मंगळवारी सुरक्षेच्या कारणावरून एकाच दिवशी सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यात सहा बोईंग ड्रीमलायनरचा समावेश होता. तसेच फ्रँकफर्ट व लंडनहून हैदराबाद व चेन्नईला जाणाऱया लुफ्थान्सा आणि ब्रिटिश एअरवेजच्या दोन ड्रीमलायनर्सचे मूळ विमानतळांवर लँडिंग करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी झालेल्या इमर्जन्सी लँडिंगमुळे शेकडो प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, अहमदाबादमध्ये 270 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दुर्घटनेनंतरही विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून हवाई प्रवास सुरक्षेबाबत केंद्र सरकार निष्क्रिय असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी दिवसभरात रद्द केलेल्या सेवांमध्ये एआय 915 (दिल्ली-दुबई), एआय 153 (दिल्ली-व्हिएन्ना), एआय 143 (दिल्ली-पॅरिस), एआय 159 (अहमदाबाद-लंडन), एआय 133 (बंगळुरू-लंडन) आणि एआय 170 (लंडन-अमृतसर) या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री हाँगकाँगहून दिल्लीला उड्डाण घेतलेल्या ड्रीमलायनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाने ते विमान हाँगकाँगला माघारी नेले.
सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमान कोलकात्यात उतरवले
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्या विमानाचे मुंबई विमानतळावर येण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एआय 180 विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. त्यानुसार विमानाचे कोलकात्यामध्ये लँडिंग केले.
अहमदाबादेत ढिगाऱ्यात सापडले 800 ग्रॅम सोने
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाच्या ढिगाऱयातून 80 तोळे सोने (800 ग्रॅम ), 80 हजार रुपये रोख, एक मोबाईल, भगवद्गगीतेची प्रत, एक लॅपटॉप, 9 पासपोर्ट, 5 बॅगा आढळल्या आहेत. स्थानिक नागरिक राजेश पटेल व त्यांचे सहकारी दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत घटनास्थळी पोहचले व त्यांनी मदतकार्य केले होते. त्यावेळी या वस्तू आढळल्या होत्या. या वस्तू व दागिने सरकारी अधिकाऱयांकडे जमा करण्यात आल्या आहेत. घटनास्थळावरून जप्त केलेल्या सामानाच्या नोंदी करून त्या कुटुंबीयांकडे दिल्या जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List