रोखठोक – अब्दुल फक्त पंक्चर काढत नाही!

रोखठोक – अब्दुल फक्त पंक्चर काढत नाही!

इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांनी इस्रायलबरोबरचे युद्ध जिंकले. त्यात अमेरिकेलाही अद्दल घडवली. इस्रायलचे आयर्न डोम वगैरे दंतकथाच ठरले. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील मुसलमानांची चेष्टा केली होती. हे लोक पंक्चरच काढू शकतात हे त्यांचे म्हणणे, पण अब्दुल क्षेपणास्त्रही बनवतो व प्रे. ट्रम्प, नेतान्याहूलाही धडा शिकवतो. तो सरेंडरही होत नाही हे इराणच्या विजयाने दाखवून दिले.

इराणने युद्ध जिंकले आहे. युद्धाचे विश्लेषण कोणी कोणत्याही पद्धतीने करो, पण 86 वर्षांच्या अयातुल्लाह खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणच्या जनतेने एकाच वेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि प्रे. ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून दिली. “सुरुवात भलेही तुम्ही केली असेल, पण शेवट आम्ही करणार!” असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या खामेनी यांनी कतार, सीरियाच्या, बहरीनच्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करून बदला पूर्ण केला. आतापर्यंत अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची हिंमत चीन, रशियासारख्या देशांनी दाखवली नव्हती. शाब्दिक युद्धात सगळेच आघाडीवर राहिले, पण इस्रायलच्या बाजूने उभे राहत प्रे. ट्रम्प यांनी इराणवर त्यांच्या विमानाने बॉम्बहल्ले केले तेव्हा जराही विचलित न होता खामेनी म्हणाले, “अमेरिकेने युद्ध अपराध केला आहे. त्यांना मधे पडायची गरज नव्हती. याची जबर किंमत त्यांना मोजावीच लागेल.” अमेरिकेला वाटले, आपल्या बॉम्बहल्ल्यानंतर इराण घाबरून माघार घेईल, पण हा बॉम्बहल्ला प्रे. ट्रम्प यांच्यावरच उलटला. अमेरिका सर्वशक्तिमान नाही, त्यांनाही मारू शकतो हे इराणने दाखवले. इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांनंतर युद्धबंदी झाली ती इराणच्या अटी-शर्तींवर. समाज माध्यमांवर इराणने इस्रायलवरील शेवटच्या बॉम्बहल्ल्याचे छायाचित्र दाखवून म्हटले, “we shoot the last fire.” ‘‘शेवटचा हल्ला आम्ही केला’’ हा अत्यानंद व्यक्त करून युद्ध थांबले (तात्पुरते). इराणची राजधानी तेहरान येथे जनतेने मंगळवारी रात्री रस्त्यावर येऊन विजयाचा उत्सव साजरा केला. कालपर्यंत आकाशात ‘मिसाईल’ व ‘ड्रोन’ उडत होते. मंगळवारी रात्री त्याच आकाशात फटाके, रंगीत दारूकामाची आरास दिसत होती. हा जल्लोष इस्रायलला माघार घ्यावी लागली याबद्दल नव्हता, तर अमेरिकी तळांवर हल्ले केले व बदला घेतला यासाठी होता. भारत-पाक युद्धबंदी झाली नसती तर भारतीय जनतेलाही असा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली असती. ज्यांचा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान जिवंत आहे ते ‘महाशक्ती’ म्हणवणाऱ्यांशी लढतात व विजयी होतात, तर व्यापारी गुंत्यात अडकलेले राज्यकर्ते प्रे. ट्रम्प यांच्या सांगण्याने दोन-तीन दिवसांत ‘सरेंडर’ होतात.

आता ते थांबणार नाहीत

इस्रायलने माघार घेतल्यानंतर ‘इराण’ एक देश म्हणून आणि अयातुल्लाह खामेनी एक नेते म्हणून जगात लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी मुसलमानांची चेष्टा केली होती. हे लोक फक्त ‘पंक्चर काढण्याच्या लायकीचे’ असा मोदी यांचा सूर होता, पण इराणने दाखवून दिले, अब्दुल केवळ पंक्चरच काढत नाही, तर अमेरिका, इस्रायलला मागे हटायला लावणारी लांब पल्ल्याची मिसाईल्सदेखील बनवतो आणि अब्दुल त्याच्या देशाच्या स्वाभिमानासाठी लढतो. तो प्रे. ट्रम्प यांना घाबरत नसतो. 13 जून रोजी इस्रायलने इराणवर पहिला जोरदार हल्ला केला. त्यात इराणचे बहुतेक सर्व वरिष्ठ सैन्य अधिकारी मारले गेले. हा इराणला हादरा होता, पण इराण रडत बसला नाही. सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनी यांनी इराणी जनतेला उद्देशून लगेच भाषण केले, ते त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करावे असे आहे. खामेनी सांगतात, “हल्ल्यानंतर मी आपल्या सैन्य कमांडरला बोलावणे पाठवले. मला सांगण्यात आले, कालच्या हल्ल्यात ते मारले गेले. मी नेव्ही कमांडरला निरोप दिला. मला सांगितले, तेदेखील कालच्या हल्ल्यात मारले गेले. मी संरक्षण खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावले तर तेही मारले गेले असे सांगितले, पण या हल्ल्याने आमचे प्रमुख योद्धे मारले गेले तरी आम्ही अधिक ताकदीने लढत राहू. इराण हा एक स्वाभिमानी व मजबूत देश आहे. आम्ही कदापि शरण जाणार नाही.” खामेनी यांनी त्यांचे हे वक्तव्य जगाला खरे करून दाखवले. खामेनी हे धार्मिक नेते आहेत हे खरे, पण इतर इस्लामी राष्ट्रांप्रमाणे त्यांच्या वागण्या-बोलण्यात विखार नाही. इराणचा जगाच्या इतर भागात दहशतवादी कृत्ये व घडामोडींत कधीच सहभाग नाही. इराण म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक नाही. भारतात सध्याचे धर्मांध हिंदुत्ववादी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचे रक्षण, संस्कृतीचे रक्षण करू इच्छितात, त्यापेक्षा सौम्य पद्धतीने इराणची संस्कृती, धर्म, संस्कारांचे रक्षण केले जात आहे व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. खामेनी हे शिकलेले आहेत. ते स्वतः उत्तम वक्ते, लेखक, कवी आणि शायर आहेत. ते फार्सीत शेरो-शायरी करतात. पंडित नेहरू आणि महात्मा गांधींच्या विचारांचा खामेनींवर प्रभाव आहे. पंडित नेहरूंचे पुस्तक `Glimpses of World History’ या पुस्तकाने ते प्रभावित आहेत व आपल्या भाषणात ते पंडित नेहरूंच्या पुस्तकातील संदर्भ अनेकदा देत असतात. भारताविषयी त्यांच्या मनात ममत्व आणि आदर आहे व इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी मोठा भारत दौरा केला. दिल्ली, कश्मीरमध्ये त्यांचा मुक्काम होता. इंदिरा गांधींनाही ते भेटले होते. कश्मीरप्रश्नी खामेनी यांनी पाकिस्तानला कधीच मदत केली नाही. कश्मीरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या अखत्यारीत सोडवावा हे त्यांचे मत प्रसिद्ध आहे. खामेनींचा प्रवास इमाम ते सुप्रीम लीडर असा झाला व तो संघर्षमय आहे. आपल्या देशात त्यांनी धर्म, विज्ञान आणि विकास याची सांगड घातली.

परमाणू हत्यारांची बोंब

इराणकडे परमाणू हत्यारे आहेत व ते त्यावर काम करीत असल्याचा बहाणा करून इस्रायलने इराणवर पहिला हल्ला केला. हाच कांगावा इराक व सद्दाम हुसेनच्या बाबतीत अमेरिकेने केला आणि इराकवर हल्ला करून सद्दामचा बळी घेतला. सद्दामला संपवल्याशिवाय इस्रायलला हातपाय पसरता येणार नाहीत व त्यातला वाटा अमेरिकेला मिळणार नाही हे त्यामागे धोरण होते. आता इराण एक शक्ती म्हणून पुढे येत आहे. तो अधिक पुढे आला तर मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायलच्या वर्चस्वाला अडथळे निर्माण होतील या भीतीने इराणवर आरोपपत्र ठेवले व विनाचौकशी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तक्रारदार इस्रायल, फौजदारही इस्रायल व न्यायमूर्ती अमेरिका हा असा खेळ आहे, पण सर्व खेळच इराणने उलटवला.

युद्धबंदी टिकेल?

इराण-इस्रायलमध्ये याक्षणी युद्धबंदी झाली, पण ती किती टिकेल? इस्रायलवर आपला विश्वास नाही हे खामेनी वारंवार सांगतात. आज इराणच्या हल्ल्यात इस्रायल घायाळ झाला. तो पुन्हा तयारी करून उठेल व हल्ला करेल असेच इराणला वाटते. त्यामुळे इराणही अधिक ताकदवान होण्याचा प्रयत्न करत राहील. इस्रायल काही उलटसुलट करताना दिसला तर इराण इस्रायलवर पुन्हा हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. एक मात्र नक्की, इस्रायलच्या ‘अभेद्य’तेचा फुगा इराणने मागच्या दहा दिवसांत फोडला आहे. इस्रायलचे अजिंक्य हवाई क्षेत्र, आयर्न डोम वगैरे दंतकथाच ठरल्या. त्यामुळे युद्ध थांबवण्याची गरज इस्रायलला होती. युद्धबंदीनंतर इराण व इस्रायलमध्ये शांतीवार्ता सुरू होईल. त्यात मध्यस्थ कोण असेल? अमेरिका, चीन की रशिया, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत इराण त्यांचा ‘परमाणू’ कार्यक्रम थांबवणार नाही, पण युद्धबंदीच्या बदल्यात इराण अमेरिकेकडे जागतिक निर्बंध हटविण्याची मागणी करेल. सध्या तेही शक्य दिसत नाही. निर्बंधांमुळे इराणची आर्थिक आणि व्यापारी कोंडी झाली आहे. तरीही चर्चेत महत्त्वाचा मुद्दा ‘गाझा’चाच आहे. ‘गाझा’वर ज्या प्रकारचे अमानुष हल्ले इस्रायलने केले, लहान मुलांच्या कत्तली केल्या, हॉस्पिटलवर बॉम्ब टाकले, गाझाची खाण्यापिण्याची रसद तोडली, मुलांना दूध आणि पाणीदेखील मिळू दिले नाही. या अत्याचारांवर जग गप्प बसले, पण इराण उसळून उठला. गाझामधील अमानुष नरसंहार अमेरिका आणि इस्रायलच्या भीतीने सगळेच मूकदर्शक बनून बघत राहिले. याक्षणी मला ‘चार्ली हेब्दो’ (Charlie Hebdo) या फ्रेंच साप्ताहिकावरील हल्ल्याची आठवण प्रकर्षाने येते. 7 जानेवारी 2015 ला सकाळी 11.30 वाजता ‘चार्ली हेब्दो’वर दोन माथेफिरू मुस्लिम तरुणांनी हल्ला केला. अल्जेरियन वंशाचे हे मुस्लिम तरुण सख्खे भाऊच होते. या हल्ल्यात ‘चार्ली हेब्दो’चे 12 कर्मचारी ठार झाले व तितकेच गंभीर जखमी झाले. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र या साप्ताहिकाने प्रकाशित केले. त्यास इस्लामविरोधी मानून हा भयंकर हल्ला केला. या हल्ल्यानंतर अनेक जागतिक नेते ‘पॅरिस’ला एकवटले. त्यात इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूदेखील होते. या अमानुष हल्ल्याचा निषेध म्हणून या नेत्यांनी पॅरिसच्या रस्त्यावर एक पदयात्रा काढली, पण यापैकी एकाही जागतिक नेत्याने नेतान्याहू यांनी गाझात केलेल्या नरसंहारावर शब्द काढला नाही. 60 हजार नागरिक व 20 हजार मुलांना मारले. संयुक्त राष्ट्रांचे 237 स्वयंसेवक आणि 225 पत्रकार गाझात मारले गेले. या अमानुष हत्याकांडाबद्दल एकाही जागतिक नेत्याने इस्रायलच्या विरोधात ‘निषेध’ किंवा ‘शांती मोर्चा’ काढला नाही. गाझातील हत्याकांडावर दुःख व्यक्त केले नाही. निदान मुलांना व त्यांच्या आयांना तरी मारू नका असे सांगितले नाही. एकटा इराण या अमानुष हत्याकांडाविरुद्ध उभा राहिला व अमेरिका, नेतान्याहूची पर्वा न करता लढला.

खामेनी यांच्या संघर्षामुळे इराण एक सार्वभौम राष्ट्र म्हणून पुन्हा जगासमोर आले. इतक्या मोठ्या विजयानंतरही इराणचा हा ‘सुप्रीम लीडर’ नम्र आहे. जनता व जग त्यांचा ‘जय’ करीत आहे, पण खामेनी स्वतःला विश्वगुरू मानत नाहीत. त्यांनी तेहरानला रोड शो केले नाहीत, ‘फौजी’ गणवेश घालून फोटोसेशन केले नाही. त्यांनी देशाच्या दुश्मनांशी युद्ध केले. ते जिंकले. इतिहास लढणाऱ्यांना लक्षात ठेवतो. खामेनी लढले.

आतापर्यंत ‘द ग्रेट बिटन’ असे म्हटले जात असे. आता इराणही ‘ग्रेट’ झाले.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या