कारागृहात जैन जेवण का नाही? कोर्टाची आर्थररोड कारागृह अधीक्षकांना नोटीस
कारागृहात जैन पद्धतीचे जेवण का दिले जात नाही, असा सवाल करत विशेष न्यायालयाने आर्थररोड कारागृह अधीक्षकांना नोटीस धाडली आहे.
रितेशकुमार एस शाह या आरोपीने कारागृहात जैन पद्धतीचे जेवण मिळत नसल्याची तक्रार मे महिन्यात विशेष न्यायालयात केली. जैन जेवण मिळत नसल्याने केवळ चपाती खावी लागत आहे, असेही शाहने न्यायालयाला सांगितले. त्यानुसार शाहला जैन पद्धतीचे जेवण देण्याचे आदेश न्यायालयाने कारागृहाला दिले होते. तरीही जैन जेवण दिले जात नसल्याचे शाहच्या वकिलांनी गेल्या आठवडय़ात न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना याचा खुलासा करण्याचे आदेश दिले.
वजन कमी होतंय
मी जैन असून धार्मिक आहे. धार्मिक आवश्यकतेनुसार मला आहार करावा लागतो. मात्र कारागृहात जैन पद्धतीचे जेवण मिळत नाही. त्यामुळे केवळ चपाती खावी लागते. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. वजन कमी होत आहे, असे शाहचे म्हणणे आहे. मालेगाव येथील नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने शाहला अटक केली. त्याच्यावर मनी लॉण्डरिंगचा आरोप आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List